निगडी : भक्ती -शक्ती चौकात नव्या बसडेपो समोर बसची वाट पाहत उभा असलेल्या एका 19 वर्षीय रमन नाथाराम मोरे या तरुणाचा बसने दिलेल्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या तरूणाच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली होती. याचीच दखल घेत पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून मृत तरूणाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.
याबाबत खैरनार यांनी पीएमपीएमएल अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत पीएमपीएमएल विभागाकडून खैरनार यांना पुढील कार्यवाहीची माहिती पत्राद्वारे कळविली आहे. अपघातग्रस्त बसवरील चालक संदिप अंबादास आंधळे यांचा सकृत दर्शनी निष्काळजीपणा व दोष दिसून आल्याने त्यांचे त्वरीत निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशी चालू केल्याचे म्हटले असून सदर दिवशी झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून महामंडळ त्यांचे कुटूंबियांच्या दु:खात सामील आहे. संचालक मंडळाच्या ठरावानुसार महामंडळाकडून त्यांचे वारसास तातडीची मदत म्हणून दोन लाख रूपयांचा धनादेश मृत व्यक्तिचे वडिल नाथाराव अंबादास मोरे यांच्या नावे देण्यात आला आहे.