पीएमपीएमएलच्या दरवाढीमागे भाजपच

0

पुणे । पीएमपीएमएलने केलेल्या दरवाढीमागे भाजपचाच चेहरा आहे. अन्यथा त्यांनी ही दरवाढ होऊच दिली नसती, असा आरोप विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

16 ऑगस्ट रोजी पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या पास दरात वाढ केली. एवढेच नव्हे तर ही वाढ तब्बल 57 टक्क्यांनी केली आहे. ती अन्यायकारक असून, याला सत्ताधारी भाजपने बैठकीत विरोध करणे अपेक्षित असताना त्यांनी ते केले नाही. त्यामुळे या दरवाढीमागे भाजपचाच चेहरा असल्याचे तुपे म्हणाले.

दरवाढीचे कारण हास्यास्पद
दरवाढ करून भाजपने काय साध्य केले हे समजत नाही. तूट कमी करण्याकडे लक्ष दिले जात नाही. जुने स्पेअरपार्ट वापरले जातात. जाहिरात निविदांमध्ये गोंधळ आहे. त्यात लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळत नाही आणि सामान्य पुणेकरांवर मात्र दरवाढ लादली जात आहे, असे तुपे यांनी सांगितले. पीएमपीएमएलला होणारी तूट महापालिकेकडून वसूल केली जाते आणि दुसरीकडे विद्यार्थी आणि ज्येष्ठांकडूनही पासदरात वाढ करून पैसे घेतले जातात, ही बाब चुकीची आहे. या निर्णयात भाजपचे पदाधिकारी काहीच बोलू शकत नाहीत आणि पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे हे ऐकत नाही, असे दिले जाणारे कारण अत्यंत हास्यास्पद असल्याचे तुपे म्हणाले.

…तर आंदोलन करू
वास्तविक ज्याचा शेअर जास्त तो निर्णय घेतो. पीएमपीएमएलमध्ये पुणे महापालिकेचा वाटा 60 टक्के आहे. पिंपरी-चिंचवडचा 40 टक्के आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ते या निर्णयाला विरोध करून तो रोखू शकले असते. परंतु भाजपलाच दरवाढ करायची होती असाही आरोप तुपे यांनी केला. ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी असे आवाहन आम्ही त्यांना केले असून, तसे न केल्यास प्रवासी संघाला घेऊन आंदोलन करू, असा इशाराही तुपे यांनी दिला आहे.

सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे आंदोलन
पीएमपीएमएलने केलेल्या पास दरवाढी विरोधात पुणे महापालिकेत राष्ट्रवादीने आज तीव्र आंदोलन केले. तर विद्यार्थ्यांना निकृष्ट शालेय साहित्य मिळाल्याबद्दल शिवसेनेने आवाज उठवला. राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी दरवाढ मागे घ्या, अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दुसरीकडे 15 ऑगस्टपूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश पुरवणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, 15 ऑगस्टनंतरही महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात आले नाहीत. याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी इतर पक्ष शांत झाल्यानंतरही शिवसेनेची नारेबाजी सुरूच होती.