चिंचवड :- मागील तीन दिवसांपूर्वी भर रस्त्यात पीएमपीएमएल बस बंद पडली होती. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आज (रविवारी) पुन्हा एका पीएमपीएमएल बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. आज सकाळी अकराच्या सुमारास चिंचवड गावातून वाकडच्या दिशेने जाणारी पीएमपीएमएल बस (एम एच 14 / सी डब्ल्यू 3032) आदित्य बिर्ला हॉस्पिटलजवळ आली असता बसचा स्टेअरिंग रॉड तुटला. त्यामुळे भर रस्त्यात बस थांबली. रस्त्याचा बहुतांश भाग बसने व्यापल्यामुळे अन्य वाहनांना अतिशय अरुंद रस्ता राहिला. त्यामुळे वाहतूक संथ झाली. या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने वाहनांची चांगलीच गोची झाली.
यावेळी वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर पाठविण्यात आले आहे. बंद पडलेल्या बसला बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. काही वेळेतच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, असे चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव पाटील यांनी सांगितले.