आळंदीत वाहतूक कोंडीने चक्काजाम
पादचारी नागरिकांना रहदारीचा त्रास
आळंदी : देवाच्या आळंदीतील लग्न समारंभ, भाविक व औद्योगिक नगरीकडे जाणार्या अवजड वाहनांमुळे आळंदीतील रस्ते, विविध चौक जात झाल्याचे रविवारी पाहावयास मिळाले. या दरम्यान पादचारी नागरिकांनी रहदारीस त्रासाचे झाल्याने नाराजी व्यक्त केली. आळंदीतील चाकण चौक, नगर परिषद चौक, नवीन एस.टी स्टॅन्ड चौक, मरकळ रस्ता चौकात झालेल्या वाहनांच्या गर्दीने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. यात बेजबाबदार वाहन चालकांनी गाडी पुढे रेटण्याचा प्रयत्नात आणखीच वाहतूक कोंडी वाढली.
हे देखील वाचा
नियोजनाअभावी अनेकांची नाराजी
इंद्रायणी नदीवरील नवीन व जुन्या पुलावर दुतर्फा वाहनांमुळे वाहने रखडली. पीएमपीएमएलच्या बस वाहकांच्या दुर्लक्षाने नदी वरील पुलावर दोन्ही रूळावर दुतर्फा सार्वजनिक प्रवासी बसेस एकाच वेळी आल्याने बसेसची संख्या पुलावर वाढून वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे पुलाचे दुतर्फ़ा वाहनांच्या रांगा दूरवर पोहचल्या. अनेक वाहन चालकांनी गाड्यांना वाट मोकळी करून देत गर्दीतून मार्ग काढला. दुचाकी, सर्व प्रकारच्या वाहनांची यावेळी पुलावर गर्दी झाल्याने नियोजनाअभावी अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
भाविकांच्या वाहनांची गर्दी..
जोडून आलेल्या सुट्ट्यांनी तसेच येथे होणार्या लग्न यांची यात भर पडली. या शिवाय भाविकांची मंदिरात दर्शनास गर्दी झाली होती. दर्शनासाठी आलेली भाविकांची वाहने देखील आळंदीतील वाहतुकीच्या कोंडीत वाढ करुन गेली. दरम्यान, या ठिकाणी नसलेल्या योग्य नियोजनाने अधिकची कोंडीत भर पडली. यामुळे आळंदीत वाहतुकीची कोंडी वाढली. वाहनांच्या रांगा लागल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. चाकण चौक, नगरपालिका चौक, मरकळ चौक, वडगाव चौक, बस स्थानक चौक या ठिकाणी वाहतूक कोंडी कायम राहिली.