पीएमपीएमएलने कमावले 5 कोटी!

0

पुणे । गणेशोत्सव काळात जादा बसेसच्या माध्यमातून पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) 4 कोटी 98 लाख 66 हजार 300 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या उत्पन्नात 1 कोटी 59 लाख रुपयांनी वाढ झाली आहे.

मागील वर्षी पीएमपीएमएलला गणेशोत्सव काळात 3 कोटी 31 लाख 84 हजार 240 रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा हे उत्पन्न 1 कोटी 59 लाखांनी वाढून 4 कोटी 98 लाख 66 हजार 300 रुपये मिळाले आहे. दि.25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर यादरम्यान पुणे व पिंपरी-चिंचवड येथील प्रमुख मार्गावर पीएमपीने 649 जादा बसची व्यवस्था केली होती. या बस रात्री 10नंतर विशेष बस म्हणून सोडण्यात आल्या होत्या. मागील वर्षीपेक्षा यंदा 27 जास्त बस मार्गावर होत्या. गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी शहराच्या उपनगरातून प्रवाशांची सोय व्हावी म्हणून ही व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पुणे शहर व पिंपरी चिंचवड भागातील मुख्य मार्गावर वर्तुळ मार्गाची आखणी करण्यात आली होती. त्याचा तिकीट दर 10 रुपये ठेवण्यात आला होता. तसेच रात्रीपाळीच्या तिकीट दरात 5 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

रात्रीपाळीच्या तिकीट दरात केलेली पाच रुपयांची वाढ ही सरसकट असल्यामुळे जे प्रवासी नियमितपणे रोज रात्रपाळीत प्रवास करतात त्यांना देखील या दरवाढीचा फटका बसला. याबाबत पीएमपीएमएल प्रवासी संघाने प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती.