परिसरात बससेवा सुरू नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा घ्यावा लागतो आधार
चिंबळी : चाकण, आळंदी परिसरातील नागरिकांना पुण्यातील बाजारपेठेत येता-जाता यावे, या उद्देशाने पूर्वीची मार्केट यार्ड ते चाकण (व्हाया आळंदी, चिंबळी मार्गे) ही बससेवा पीएमपीएमएल प्रशासनाने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. पूर्वी सुरू असलेली ही बससेवा बंद झाल्याने सध्या नागरिकांना खासगी वाहनांची मदत घ्यावी लागत आहे. असुरक्षित प्रवास, अवाजवी भाडे आकारणी, वेळेचा अपव्यय यामुळे नागरिक पुरते त्रासले आहेत. म्हणून पीएमपीएमएल प्रशासनाने नागरिकांच्या मागणीची दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
बस लुटीचा झाला होता प्रयत्न
चाकण, आळंदी, चिंबळी या परिसरातील नागरिकांना पुण्यातील बाजारपेठेत जाता यावे, या उद्देशाने काही वर्षांपूर्वी पीएमपीएमएल प्रशासनाकडून मार्केट यार्ड ते चाकण (व्हाया आळंदी, चिंबळी मार्गे) ही बससेवा (मार्ग क्रमांक 65) सुरू करण्यात आली होती. या बससेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पुण्यातील मुख्य बाजारपेठेत जाता-येता होते. शिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणासाठी येण्या-जाण्याची सोय झाली होती. या बससेवेला उदंड प्रतिसाद लाभल्याने पीएमपीएमएलला अधिकचा नफादेखील मिळत होता. मात्र, 2008 मध्ये आळंदी-चाकण घाटात रात्री साठेआठच्या सुमारास मार्केट यार्ड ते चाकण ही पीएमपीएमएलची बस दरोडेखोरांनी लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी येथील रस्तेही खराब होते. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाने ही बससेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद केली होती.
व्यापारी, भाजीविक्रेत्यांना होता फायदा
चाकण, आळंदी, चिंबळी तसेच अन्य गावातील लहान-मोठ्या व्यापार्यांना पूर्वीच्या मार्केट यार्ड ते चाकण (व्हाया आळंदी, चिंबळी मार्गे) या बससेवेचा सर्वाधिक फायदा होत होता. ग्रामीण भागातील भाजीविक्रेते, किरकोळ मालाचे व्यापारी यांना पुण्यातील मार्केट यार्डमध्ये जाता येत होते. तसेच आळंदी, चिंबळी येथील व्यापारी, भाजीविक्रेते यांना चाकणच्या मार्केट यार्डात जाता येत होते. मात्र, ही बससेवा बंद झाल्याने सर्वांचीच अडचण झाली. आता खासगी वाहनांचा आधार घेऊन सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. वैद्यकीय अडचण आली तर ग्रामीण भागातील लोकांना सर्वाधिक त्रास होत आहे.
खासगी वाहनधारकांची चांदी
पीएमपीएमएल प्रशासनाने पुणे मार्केट यार्ड ते चाकण ही बससेवा बंद केल्याने खासगी वाहनधारकांचे चांगलेच फावले आहे. नागरिकांची गरज ओळखून खासगी वाहनधारक अवाजवी भाडे आकारतात. मनमानी पद्धतीने सीट भरतात. त्यामुळे नागरिकांना पैसे देऊन जीव धोक्यात घालावा लागत आहे. तसेच, खासगी वाहनधारक जास्त प्रवासी असल्याशिवाय वाहन पुढे नेत नाहीत. क्षमतेपेक्षा जास्तीचे प्रवासी बसविणे, जादा पैसे घेणे, असे प्रकार सुरू आहेत. चाकण, आळंदी तसेच चिंबळी परिसरात आता लोकवस्ती वाढली आहे. रस्तेही चांगले आहेत. मात्र, बससेवा सुरू नसल्याने अडचणी आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलने आपली बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी आहे.