पिंपरी : ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पीएमपी बस पासची रक्कम 700 रुपयांऐवजी 500 रुपये करण्यास आणि विद्यार्थी मासिक पंचिंग पास पूर्वीप्रमाणे सुरू करण्यास पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार 12 मार्चपासून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांची दैनिक पास रक्कम 40 रुपये ही पूर्वीप्रमाणेच असून, त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. महापौर नितीन काळजे यांनीही ज्येष्ठ, विद्यार्थी आणि इतर पासमधील भाडेवाढ कमी करण्याची तत्काळ धोरणात्मक कार्यवाही करावी, अशी सूचना ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालकांना केली होती. त्यानुसार ‘पीएमपी’च्या संचालक मंडळाने वरील निर्णय घेतला. दरम्यान, श्री. रुपनर यांनीही नियोजित आंदोलन मागे घेत असल्याचे ‘पीएमपी’ प्रशासनाला कळविले आहे.