देहूरोड : देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगर, निगडी येथे एका बंद घराचा कडी-कोयंडा व कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख 8 हजारांचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जावेद नजीर आत्तार (वय 31, रा. घर क्रमांक 167, सर्वे क्रमांक 17/4, दत्तनगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. आत्तार हे पीएमपीएमएलमध्ये बस चालक आहेत.
कुटुंबासह गेले होते बाहेर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद आत्तार हे रविवारी कुटुंबासह दुपारी बाहेर गेले होते. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास ते घरी परतले. यावेळी दरवाजाचे कुलूप उचकटलेले तसेच दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच पोलिसांशी संपर्क साधला. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले. कपाटातील अर्धा तोळे वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या, एक तोळ्याचे गंठण, अर्धा तोळा वजनाची कर्णफुले, लहान बाळाची अंगठी, चांदीचे पैंजण आणि 22 हजारांची रोकड असा एकूण एक लाख 8 हजारांचा ऐवज चोरी झाल्याचे आढळून आले. त्यानंतर आत्तार यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.