चाकण : दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी पीएमपीएमएल बसच्या चालकाला शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी गावाच्या हद्दीत घडली. याप्रकरणी बस चालकाच्या फिर्यादीवरून मारहाण करणार्या दोन्ही तरुणांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सावळेराम माने (वय 43, रा. आदर्शनगर, मोरया कॉलनी, मोशी. मूळ रा. अशोकनगर, भोसरी) असे मारहाण झालेल्या पीएमपीएमएल बस चालकाचे नाव आहे.
शिवीगाळ, दमदाटीही केली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरून जाताना कुरुळी गावाच्या हद्दीत दुचाकीवरून जाणार्या दोन तरुणांनी पीएमपीएमएल बस अडवली. दोघांनी बस चालकास, ‘तू आमच्या दुचाकीला कट का मारला, तुम्हा बसवाल्यांना जास्त माज आला आहे’, असे सांगून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर दोघांनी बस चालकाला बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर दोघेही दुचाकीवरून खेडच्या दिशेने पळून गेले. याप्रकरणी बस चालक अनिल माने यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मारहाण करणार्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय जाधव पुढील तपास करीत आहेत.