पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची लाईफलाईन असलेल्या पीएमपीएमएलच्या तोट्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गतवर्षी 50 कोटीच्या घरात असलेला तोटा यंदा 343.76 कोटींवर गेला असल्याची कबुली पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. मुंढे आल्यानंतर ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारेल असे वाटले होते. परंतु, मुंढे काहीही चमत्कार घडवू शकले नाहीत. या उलट त्यांनी दररोज प्रवास करणार्या नोकरदार, विद्यार्थी यांच्या खिशाला झटका देत, मासिक पासचा दर 1200 रुपयांवरून 1400 रुपये करण्याचा कटू निर्णय जाहीर केला. शहरांतर्गत व बाह्य असे प्रकार रद्द करत, संपूर्ण पुण्यासाठी हाच दर राहणार आहे, अशी माहितीही मुंढे यांनी दिली.
एडसबाधितांना मोफत प्रवास, दंडाच्या रकमेतही वाढ
तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, यंदा पीएमपीएमएलला 343 कोटी 76 लाख 23 हजार 16 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तोट्यात झालेल्या वाढीमागे उत्पन्नातील घट हे एक महत्वाचे कारण असल्याचे ते म्हणाले. सीएनजी इंधनाच्या वाढत्या किमती हेदेखील यामागचे कारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, बसची देखभाल-दुरुस्ती, वाढता इंधन खर्च, कर्मचार्यांच्या पगारात झालेली वाढ यामुळेही तोट्यात भर पडली असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. मासिक पासच्या दरांमध्ये बदल झाला असून, शहराच्या हद्दीबाहेर आणि हद्दीमध्ये प्रवास करणार्यांसाठी आता एकच दर आकारला जाणार आहे. सर्वांसाठी आता 1400 रुपये भरून महिनाभर प्रवास करण्यासाठी पास उपलब्ध करून दिला जाणार असून, येत्या 1 सप्टेंबर 2017पासून हे नवीन बदल समाविष्ट केले जाणार असल्याचेही मुंढे यांनी सांगितले. मोफत पासच्या सवलती पूर्वीप्रमाणेच असल्या तरी यंदापासून पहिल्यांदाच एडसबाधित रुग्णांनाही 100 टक्के अनुदान अर्थात मोफत प्रवास करता येणार असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय, विनातिकीट प्रवास करणार्यांच्या दंडाच्या रकमेमध्येही मोठी वाढ केली जाणार असून, हा दंड 21 ऑगस्ट 2017 पासून 100 रुपयांवरून 300 रुपये इतका आकारण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सीएनजीवर धावणार्या 400 बस घेणार!
येत्या दीड वर्षांमध्ये पीएमपीएमएलच्या ताफ्यात तब्बल नव्या 800 बस समाविष्ट होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याला बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे मुंढे यांनी सांगितले. यामध्ये पर्यावरणाचा विचार करून सीएनजी गॅसवर चालणार्या 400 तर डिझेलवर चालणार्या 400 बस घेण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जुन्या बस बाद करून नव्या सामाविष्ट झाल्यावर पीएमपीएमएलच्या बसेसची एकूण संख्या 2 हजार 490 वर पोहोचणार आहे. नव्या सर्व बस ऑटोमॅटिक गिअरच्या असणार आहेत. यामुळे चालकांबरोबरच सर्व प्रवशांनाही आरामदायी प्रवास करता येईल. तसेच बसमध्ये पॅसेंजर काऊंटर, सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. प्रत्येक बस ही बीआरटी मार्गावर चालण्याच्या सर्व नियमांमध्ये बसणारी असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वाहन खरेदीसाठी येत्या तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया राबवणार असल्याचेही मुंढे यांनी जाहीर केले. या बस उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा सध्या तरी पीएमपीएमएलकडे नाही. त्यासाठी महापालिकांकडून पुरेशा जागा उपलब्ध करून घेईल, असा विश्वासही मुंढे यांनी व्यक्त केला.