3 लाख 53 हजारांचा दंड वसूल; 15 कोटी 63 लाख 36 हजार 270 रुपयांचे उत्पन्न जमा
पुणे : गणेशोत्सवात पीएमपीमधून विनातिकीट प्रवास करणार्या एकूण एक हजार 176 फुकट्या प्रवाशांवर पीएमपी प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल 3 लाख 52 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, निगडी ते दापोडी बीआरटी मार्गात घुसखोरी करणार्या वाहन चालकांवर पीएमपी आणि वाहतूक पोलिसांकडून संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली असून गुरुवारी घुसखोरी करणार्या 35 खासगी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
गणेशोत्सवात पीएमपी प्रशासनाकडून जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या जादा गाड्यांच्या सेवेमुळे महामंडळाच्या तिजोरीत 15 कोटी 63 लाख 36 हजार 270 रुपयांचे उत्पन्न जमा झाले. या दरम्यान फुकट्या प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली होती. गणेशखिंड रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सिंहगड रस्ता, सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, वेस्टएन्ड, बंडगार्डन, वानवडी कॉर्नर, वसंतबाग, सातववाडी या भागात ही पथके कार्यरत होती. या पथकाने केलेल्या कारवाईत एक हजार 176 फुकटया प्रवाशांकडून 3 लाख 52,900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड यांनी दिली.पीएमपीकडून निगडी ते दापोडी हा बीआरटी मार्ग सुरू करण्यात आला आहे. या मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी होत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे.