गर्दीच्या वेळी मार्गावर सोडल्या जात नाहीत बस
प्रवाशांचे अतोनात हाल; उत्पन्नावर होतोय परीणाम
पिंपरी-चिंचवड : पुणे महानगर परिवहन महामंडळाचा(पीएमपीएमएल) ढिसाळ, नियोजनशून्य कारभार काही केल्या सुधारताना दिसत नाही. निगडी डेपोचा तर मनमौजी कारभार सुरु आहे. या डेपोतून प्रवाशांच्या गर्दीच्या वेळी मार्गावर बस सोडल्या जात नसल्याच्या अनेक तक्रारी प्रवाशांनी ’दैनिक जनशक्ति’कडे केल्या आहेत. निगडीतून हिंजवडीला सकाळच्या वेळी आणि भोसरीला जाण्यासाठी सायंकाळच्या सुमारास प्रवाशांची संख्या अधिक असतानाही बस सोडल्या जात नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. गर्दीच्यावेळी बस न सोडल्यामुळे पीएमपीएमच्या उत्पन्नावर देखील परिणाम होत आहे याचे मात्र पीएमपीएमएल प्रशासनाला कोणतेही सोयरसुतक नाही, असा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.
गर्दी ओसरल्यावर लागोपाठ बस
पीएमपीएमएलचा निगडीत बस डेपो आहे. या डेपोतून पुण्याच्या विविध मार्गावर बस सोडल्या जातात. परंतु, बस सोडताना कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नसल्याचे समोर आले आहे. गर्दीच्या वेळी मार्गावर बस सोडल्या जात नसून गर्दी संपल्यानंतर एकापाठोपाठ बस सोडल्या जात असल्याचे, चित्र आहे. निगडीतून हिंजवडीला जाण्यासाठी सकाळच्यावेळी प्रवाशांची संख्या अधिक असते. सकाळी साडेसात ते साडेआठ या दरम्यान अधिक प्रवासी असतात. परंतु, या गर्दीच्यावेळी बस मार्गावर येतच नाहीत. गर्दी ओसरल्यानंतर एकापाठोपाठ बस सोडल्या जातात, अशा तक्रारी प्रवाशांनी ’दैनिक जनशक्ति’कडे केल्या आहेत. पीएमपीएमलच्या या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. नियोजितवेळेत इच्छितस्थळी प्रवाशांना पोहचता येत नाही.
निगडी आगारप्रमुखांचे दुर्लक्ष
निगडीतून भोसरीकडे जाण्यासाठी सायंकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने प्रवाशी असतात. या मार्गावर तर नियोजित वेळापत्रकाप्रमाणे दर दहा मिनिटाला बस आहे. परंतु, कधीच वेळेवर बस सुटत नसल्याचे वाचक तन्मय डुंबरे यांनी सांगितले. बस अर्धा ते पाऊण तासानंतर सुटतात. यामुळे प्रवाशांचे हाल होतात. बस नियोजित सुटत नसल्याबाबत आपण निगडीच्या आगरप्रमुखांकडे 10 ते 12 वेळा तक्रार केली आहे. परंतु, ते याकडे दुर्लक्ष करत आहेत.
तक्रार निवारणाचे खोटे मेसेज
तक्रारीचे निराकरण झाल्याचे ‘एसएमएस’ पाठवून खोटे सांगितले जाते. परंतु, प्रत्यक्षात मात्र तक्रारीचे निराकरण झालेले नसते. त्याचा विपरीत परिणाम कामावर, शाळा, कॉलेजला जाणार्या कामगार, विद्यार्थ्यांवर होतो. तक्रार केल्यानंतर तेवढेच दोन-तीन दिवस बस वेळेवर येते. पुन्हा ’ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे तीच परिस्थिती पहावयास मिळते. त्यामुळे हे जाणीवपूर्वक सुरु असल्यासारखे वाटते, असेही ते म्हणाले.
उत्पन्नावर मोठा परिणाम
गर्दीच्या वेळेत बस मार्गावर धावत नसल्यामुळे पीएमपीएमएलच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. याची देखील प्रशासनाला कोणतीही चिंता नसल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. तसेच गर्दीच्या आणि नियोजितवेळी बस सुटत नसल्याचा परिणाम पीएमपीएलची प्रवासी संख्या कमी होण्यावर होत आहे.
याबाबत बोलताना पीएमपीएमएलचे अधिकारी सुभाष गायकवाड म्हणाले, ‘निगडी डेपोतून हिंजवडी आणि भोसरीला गर्दीच्यावेळी बस सुटत नसल्याबाबत आपल्याकडे कोणतीही तक्रार, माहिती आली नाही. असे घडत असेल तर चुकीचे आहे. याची गंभीर दखल घेऊन संबंधितांकडून याबाबतची माहिती घेण्यात येईल. बसचा प्रश्न मार्गी लावला जाईल. गायकवाड यांनी पिंपरीतील समन्वयक अधिका-यांशी संपर्क साधला असून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत.
निगडीत हा प्रकार अनेक वर्षांपासून आहे. गर्दीच्या वेळी बस सोडल्या जात नाहीत. गर्दी संपल्यानंतर बस सोडल्या जातात. याला ’बचिंग’ म्हणतात. निगडीसह पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी असा प्रकार केला जातो. पीएमपीएमलकडून ठेकेदाराला किलोमीटरवर किंवा खेपेवर पैसे दिले जातात. त्यामुळे त्यांना प्रवाशांचे काही देणे-घेणे राहत नाही. त्यामुळे त्यांना प्रवासी आधारित पैसे द्यावेत, अशी आमची मागणी आहे. परंतु, पीएमपीएमएल प्रशासन याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत ओ. ठेकेदाराने ठरलेल्या करारानुसार जबाबदारी पार न पाडल्यास त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु, कारवाई केली जात नसून प्रशासनाचा हा नाकर्तेपणा आहे. पीएमपीएमएल प्रशासन आणि ठेकेदार यांची साखळी आहे. त्यामुळे ठेकेदाराने बील दिले की प्रशासनाकडून ते अदा केले जाते. त्यांना प्रवाशांचे काही देणे-घेणे नाही. कर्तव्यात कसूर केली म्हणून संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.