‘पीएमपी’चा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

0

पुणे । पुणे आणि पीएमपीएममधील 11 लाख प्रवाशांची दररोज वाहतूक करणार्‍या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपी)ने आतापर्यंत कधीही कोणत्याही प्रकारचे ‘फायर सेफ्टी ऑडिट’च केलेले नाही, असे माहिती अधिकारातून समोर आले आहे. त्यामुळे पीएमपी एकप्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे समोर आले आहे. शहरात वारंवार जळणार्‍या बसेस, तसेच 16 डिसेंबर 2017ला कोथरूड डेपोच्या आवरामध्ये बसला लागलेली आग यामुळे पुण्यातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या पीएमपीच्या ताफ्यातील बसेसची संख्या कमी होऊन, अगोदरच तोट्यात असलेले महामंडळ आणखी तोट्यात चालले आहे. या पार्श्‍वभूमीवर रुपेश राम केसेकर यांनी माहिती अधिकारांतर्गत पीएमपीकडे फायर सेफ्टी ऑडिट, अग्निशामके यांची माहिती मागवली असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

आरटीओच्या डोळ्यातही धूळफेक
त्याचबरोबर पीएमपी प्रशासन आरटीओच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतःच्या बसेसचे पासिंग करून घेत आहे. कारण अग्निशामकांची जी यादी उपलब्ध झाली आहे, त्यामध्ये 30 अग्निशामके ही फक्त बसच्या पासिंगच्या वेळेस बसमध्ये ठेवण्यात येतात व पासिंग झाल्यानंतर काढून घेतली जातात, अशी माहिती संबंधितांनी केसेकर यांना दिली आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यानुसार प्रवासी वाहतूक करणार्‍या प्रत्येक वाहनांमध्ये अग्निशामके असणे बंधनकारक आहे. पीएमपी प्रवासी मंचतर्फे तक्रारींच्या माध्यमातून वारंवार हे निदर्शनास आणून दिले आहे. तरीही पीएमपीतर्फे या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असून याचे गांभीर्य लक्षात घेतले जात नाही.

3 आगारांमध्ये अग्निसुरक्षा साधने नाही
महामंडळाकडे सर्व आगारात मिळून विविध प्रकारचे फक्त 124 अग्निशामके उपलब्ध आहेत, तर 13पैकी 3 आगारांमध्ये कोणतीही अग्निसुरक्षा साधनेच उपलब्ध नाहीत, तसेच 2017-18 या वर्षात अग्निशामकांची कोणत्याही प्रकारची खरेदी करण्यात आलेली नसून, सध्या कोणतीही खरेदी प्रक्रिया सुरू नसल्याचे सांगण्यात आले आहे, उपलब्ध अग्निशामकांच्या रिफिलिंग बाबतीतही योग्य ती नियमितता पाळली जात नसल्याचे दिलेल्या माहितीमध्ये आढळून आले आहे.

10 बसेस जळण्याच्या घटना
गेल्या काही महिन्यांत जवळपास 10 बसेस जळण्याच्या घटना लक्षात घेता, प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ज्या चालक, वाहकांवर असते, त्यांना अग्निशामके वापरण्याचे देण्यात आलेल्या प्रशिक्षणाबाबतचा कोणताही अभिलेख महामंडळाकडे उपलब्ध नाही. सद्यस्थितीत चालक, वाहक, व इतर मेकॅनिकल स्टाफला फायर फायटिंगचे ज्ञान प्राप्त असणे आवश्यक असतानाही, पीएमपी प्रशासन याबाबींकडे दुर्लक्ष करीत आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे कोणतेही धोरण तयार नसल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर काय करायचे, याबाबत कोणतीही मार्गदर्शक माहिती अभिलेख स्वरूपात उपलब्ध नाही.