पिंपरी :- पीएमपीएमलच्या बस चालकाने निष्काळजीपणामुळे ‘हॅन्डब्रेक’वर उभी केलेली बस अचानक पाठीमागे आली. ही घटना आज (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास पिंपरी येथे घडली. सुदैवाने बस मागे कोणीही नसल्यामुळे मोठा अपघात टळला. परंतु, दुचाकींचे नुकसान झाले आहे.
मोठी दुर्घटना टळली
पीएमपीएमएलचे बस स्थानक पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाच्या पाठीमागे आहे. या स्थानकात पीएमपीएमलच्या बस उभ्या केल्या जातात. एम.एच 14 सीडब्ल्यू 2139 या बसवरील चालकाने बस ‘हॅन्डब्रेक’वर उभी केली व नंतर चालक बसमधून उतरुन बाहेर गेला. थोड्यावेळाने बस अचानक पाठीमागे येऊ लागली. ही बस पाठीमागे पार्क केलेल्या दुचाकींना धडकून भिंतीला धडकून जागेवर थांबली. यामध्ये दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी पाठीमागून कोणीही जात नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पीएमपीएल बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे वाहनांचे नुकसान झाल्याचा आरोप, दुचाकी चालकांनी केला आहे. दरम्यान, हा प्रकार ‘सीसीटीव्ही’ कॅमे-यात कैद झाला आहे.