पिंपरी-चिंचवड : महापालिकेने पीएमपीकडे हस्तांतरित केलेल्या 178 कर्मचार्यांना तिकडे अधिक काम दिले जात असून, त्यांचा छळ सुरू आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या मनुष्यबळ अपुरे ठरत असल्याने; त्या कर्मचार्यांना पुन्हा महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे, असा निर्णय सर्वसाधारण सभेत उपसूचनेसह मंजूर करण्यात आला.
178 कर्मचार्यांचा प्रश्न
पीएमपीचे कर्मचारी असलेले मात्र, महापालिकेत सेवा करणार्या 178 जणांना पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या मागणीवरून एप्रिल 2017 मध्ये पुन्हा पीएमपीकडे हस्तांतरित करण्यात आले होते. त्यावेळी या कर्मचार्यांनी आपल्याला महापालिकेतच काम करू द्यावे, अशी मागणी केली होती. पदाधिकार्यांनीही कर्मचार्यांची बाजू घेतली होती. परंतु, मुंढे राजकीय दबावपुढे झुकले नाही. कर्मचारी पीएमपीमध्ये रुजू झाले नाहीत. तर, त्यांचे निलंबन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर कर्मचारी पीएमपीमध्ये रुजू झाले होते.
कदम, कलाटे यांनी मांडला विषय
पिंपरी-चिंचवडमधील कर्मचार्यांना पुण्यातील कर्मचार्यांपेक्षा अतिरिक्त काम दिले जाते. त्यांना दूर अंतरावरील हडपसर, स्वारगेट डेपोत काम दिले गेले आहे. त्यामुळे निगडी आणि चर्होलीच्या कर्मचार्यांना भल्या पहाटे दूर अंतरावरील डेपोत बायोमेट्रिक थम्ब करण्यासाठी जावे लागते. या कर्मचार्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी सभेत नगरसेविका मंगला कदम व सेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केली. त्यावर, कर्मचार्यांबाबत पूर्ण सहानुभूती असून, त्यांना पालिका सेवेत सामावून घेण्याचा निर्णय पालकत्वाच्या भावनेतून घेतला जात असल्याचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी स्पष्ट केले.