पीएमपीचे नऊ झोपाळू कर्मचारी निलंबीत

0

पुणे । कामाच्या वेळेत झोप काढणे हे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचार्‍यांना चांगलेच महागात पडले आहे. शनिवारी रात्री पुणे स्टेशन आणि कोथरुड आगारात कर्तव्यावर असलेले नऊ कर्मचारी कार्यालयात झोप काढत असल्याचे निदर्शनास आल्याने पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्यांना निलंबीत केले आहे.

पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार हाती घेताचा मुंढे यांनी कर्मचार्‍यांना कामावर वेळेत येणे, शिस्त पाळणे आदी सूचना केल्या होत्या. पीएमपीची 13 बस आगार आहेत. या आगारांची रात्रीच्या वेळी तपासणी करून कामाच्या वेळेत झोपणार्‍या कर्माचार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंढे यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार चार कर्मचार्‍यांचे पथक नेमण्यात आले होते. या तपासणीमध्ये कोथरूड आणि पुणे स्टेशन आगारातील 9 कर्मचारी झोपलेले आढळून आले. त्यात 2 चालक आणि गाड्यांची दुरूस्ती करणार्‍या वर्कशॉपमधील 7 कर्माचार्‍यांचा समावेश आहे. त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. या 2 चालकांकडे रात्रीच्या बस फेर्‍यांची जबाबदारी होती. मात्र, वेळापत्रकाच्या मधल्या वेळेत ते डुलक्या घेत पडले होते. तर उर्वरीत 7 वर्कशॉपमधील कर्मचार्‍यांवर बस दुरुस्तीची जबाबदारी होती. हे कर्मचारी झोपल्याने कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्यात आल्याची माहिती पीएमपीचे सरव्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.

पीएमपीला शिस्त लावण्याचा प्रयत्न
मुंढे यांनी पदभार स्विकारल्यानंतर कार्यलयाची वेळ बदलून 9.45 ते 5.45 केली. गुरुवारी कामावर उशीरा आलेल्या 117 कर्मचारी-अधिकार्‍यांना बिन पगारी काम करण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागले. शुक्रवारी 5 कर्मचारी उशिरा आल्याने त्यांना मुंढे यांनी निलंबीत केले. शनिवारी पीएमपीच्या विविध विभागात काम करणार्‍या 71 कर्मचार्‍यांची बदली केली. या कर्मचार्‍यांना बसेसवर वाहक-चालक म्हणून काम करावे लागणार आहे.