दररोज 4 हजार बसच्या फेर्या रद्द, 11 लाख प्रवासी
पुणे : आयुर्मान संपलेल्या बसचा वापर वाढत असल्यामुळे त्या बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी पीएमपीच्या फेर्या रद्द होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या एक महिन्यापासून दररोज सरासरी सुमारे 4 हजार बसच्या फेर्या रद्द होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
पीएमपीच्या शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिदिन सरासरी सुमारे 22 हजार फेर्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांची संख्या मात्र, सध्या 11 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे प्रवासी आहेत मात्र त्यांच्यासाठी बस अपुर्या पडत असल्याचे अधोरेखित झाले आहे.पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे दोन हजार पैकी एक हजार 450 बस सध्या रस्त्यावर धावत आहेत. बसची संख्या कमी पडत असताना, बंद पडणार्या बसचे प्रमाण वाढू नये यासाठी दोन शिफ्टमध्ये प्रयत्न सुरू आहेत. काही बस जुन्या झाल्या आहेत. त्यांचीही नियमितपणे देखभाल दुरुस्ती करण्यात येत आहे. त्याही मार्गावर धावत आहेत, असे याबाबत पीएमपीचे मुख्य अभियंता सुनील बुरसे यांनी सांगितले.
‘ब्रेक-डाउन’चे प्रमाण 100 वरून 70 झाले आहे. सुमारे 325 बस कायमस्वरूपी बंद आहेत. उर्वरित 200 बसची दुरुस्ती करून त्या मार्गावर धावतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे बुरसे यांनी सांगितले.21 हजार फेर्यांचे नियोजन आहे. त्यातील 17 ते 18 हजार फेर्या होत आहेत. उपलब्ध बस जास्त धावाव्या यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या महिन्याच्या अखेरीस नव्या बस येत आहेत. त्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल.
घटत्या बस संख्येबाबत उपाययोजना
पीएमपीच्या फेर्या मोठ्या प्रमाणात रद्द होत असल्यामुळे पीएमपी प्रवासी मंचने चिंता व्यक्त केली आहे. संघटनेतर्फे संजय शितोळे यांनी पीएमपीच्या अध्यक्ष, संबंधित अधिकारी तसेच प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्याकडे एक निवेदन दिले आहे. पीएमपीच्या गेल्या महिन्यापासून दररोज सुमारे 4 हजार फेर्या रद्द होत आहेत. या घटत्या बस संख्येबाबत तातडीने उपाययोजना करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यात केली आहे. दरम्यान, याबाबत महापौर मुक्ता टिळक, संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनाही मंचने साकडे घालत बस संख्या वाढण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.