पुणे । शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या पीएमपीला सार्वजनिक वाहतुकीचे नियमन करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. प्रशासनाकडून रोजच्या प्रवासाचे नियोजन केले जाते. प्रवाशांच्या सोयीसाठी याची माहिती पीएमपी संकेतस्थळावर जाहीर केली जाते. ठरवलेल्या नियोजनानुसार रोज शहरातील विविध मार्गावरून 1 हजार 780 गाड्यांच्या 22 हजार 416 फेर्या होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र फक्त 1 हजार 319 गाड्यांच्या 17 हजाराच्या जवळपास फेर्या पूर्ण होत असल्याचे समोर आले आहे. अनेक मार्गावरील प्रवाशांना याचा फटका बसत असून पीएमपीच्या उत्पन्नात देखील घट होत आहे.पीएमपीएमएल पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा आहे. दोन्ही शहरातील मिळून जवळपास 10 लाख प्रवासी पीएमपी बसने प्रवास करीत आहेत. मात्र, शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत बसची संख्या अपुरी आहे. अशातच आहे त्या बसेस देखील रस्त्यावर धावण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे.
पीएमपीच्या ताफ्यात मालकीच्या 1,400 तर ठेकेदारांच्या 653 बसेस आहेत. यातील काही बस दुरुस्तीअभावी मार्गावर धावत नाहीत. प्रत्यक्षात पीएमपीच्या आणि ठेकेदारांच्या मिळून 1,319 बस मार्गावर धावत असल्याचे दिसत आहे. पीएमपीच्या वाहतूक विभागाच्यावतीने रोज 325 मार्गावर बसेसच्या फेर्यांचे नियोजन करण्यात येत असते. मागील काही दिवसांपासून संकेतस्थळावर 22,416 फेर्यांचे नियोजन केले आहे. प्रत्यक्षात 17 हजारांच्या आसपास रोज फेर्या होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. बसेस उपलब्ध होत नसल्यामुळे रोज साडेपाच हजार फेर्या रद्द करण्याची नामुष्की वाहतूक विभागावर येत आहे.
फेर्यांमध्ये तफावत
पीएमपी संकेतस्थळावर नियोजीत गाड्यांची संख्या 1 हजार 780 दाखवत असून प्रत्यक्षात रस्त्यावर मात्र 1 हजार 319 गाड्याच धावत असल्याचे समोर आले आहे. बसची संख्या कमी झाल्याने बसेसच्या फेर्यांमध्ये तफावत निर्माण होत आहे. यामुळे पीएमपीला रोज मिळणार्या उत्पन्नातदेखील तोटा सहन करावा लागत आहे.
लवकरच तोडगा काढणार
ठेकेदारासह पीएमपीच्या बहुतांशी बसेसची दुरुस्ती, ब्रेकडाऊन होणे तसेच इतर कामांमुळे या बसेस रस्त्यावर येत नाहीत. त्यामुळे रोजच्या ठरलेल्या फेर्या पूर्ण होण्यात अडचणी येत आहेत. याबाबत लवकरात लवकर मार्ग काढण्यात येणार आहे.
– दत्तात्रय माने, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल