पीएमपीचे 500 बसचालक संपावर

0

पुणे : पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर असलेल्या बसेसच्या 500 चालकांनी गुरूवारी दुपारी 2 वाजता अचानक संप पुकारला. थांब्यांवर बसेस थांबत नसल्याने पीएमपीने भाड्याने बसेस पुरविणार्‍या कंपन्यांना सुमारे 9 कोटी रुपयांचा दंड केला आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या चालकांनी हा संप पुकारला होता. दरम्यान, हा संप बेकादेशीर असल्याचे पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे. या संपामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बस सेवा विस्कळीत झाली.

कंपन्या आणि चालकांना दंड मान्य नाही
पीएमपीच्या ताफ्यात 653 बसेस या भाड्याने घेतलेल्या आहेत. या बसेस थांब्यांवर थांबत नसल्याच्या कारणावरून मुंढे यांनी या बसेस पुरविणार्‍या कंपन्यांना सुमारे 9 कोटी रुपये दंड ठोठावला आहे. चालक थांब्यावर बसेस थांबत नसल्याचे कारण देत या कंपन्यांनी चालकांना दंड आकारण्याचा इशारा दिला होता. कंपन्यांकडून दंड आकारला जाण्याच्या भितीने चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. चालकांना मिळणारा पगार पाहता त्यांना आकारण्यात येणार्‍या दंडाची रक्कम मोठी आहे. तसेच, गुन्ह्याचे स्वरुप आणि त्यावर केली जाणारी शिक्षा ही कंपन्या आणि चालकांना मान्य नाही.

जीपीएस यंत्रणेत त्रुटी
यासंबंधी ट्रॅव्हलटाईम कार रेंटल कंपनीचे मंदार हिंगे म्हणाले, की थांब्यावर बसेस थांबत नाहीत, दंड आकारण्याचे कंपन्यांनी चालकांना कळवले होते. त्यामुळे चालकांनी हा दंड भरण्याच्या भितीने बसेस बंद ठेवल्या आहेत. पीएमपी प्रशासान जीपीएस यंत्रणेनुसार बसेस थांब्यावर थांबतात की नाही, याचा अभ्यास करून कंपन्यांना दंड ठोठावत आहे. पण या जीपीएस यंत्रणेमध्ये त्रुटी आहेत. एखाद्या ठिकाणी पूल उभारलेला असतो. त्यामुळे बसेस त्या पुलावरून जात असते, मात्र जीपीएस यंत्रणेनुसार बसथांबा पुलाच्या खाली असतो. त्यामुळे थांब्यावर बसेस थांबत नसल्याचे गृहीत धरून कंपन्यांना दंड केला जात आहे.

पीएमपीला 25 लाखाच फटका
पीएमपीच्या ताफ्यामध्ये गुरुवारी एकूण 1 हजार 530 बसेस होत्या. त्यात भाडेतत्त्वावर घेतलेल्या 515 बस होत्या. गुरुवारी दुपारनंतर संप सुरू झाल्यामुळे पीएमपीला सुमारे 25 लाख रुपयांचा तोटा होईल असा अंदाज आहे. दिवसाला एका बसपासून पीएमपीला सुमारे 10 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. पण कंपन्यांच्या सव्वापाचशे बसेस दुपारपर्यंत ताफ्यात असल्याने पीएमपीला 25 लाखाचाच फटका बसेल असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

कारवाई करणार : मुंढे
संपाविषयी मुंढे म्हणाले, की अचानकपणे भाडेतत्वावरील बस चालकांनी संप पुकारला आहे. संपाबाबत कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आलेली नाही. या संपात सहभागी झालेल्या ठेकेदारांवर योग्य कारवाई केली जाईल. ठेकेदारांनी अचानक पुकारलेल्या संपाचा नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने मालकीच्या सर्व बसेस रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.