पुणे । महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) सेवेत कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आलेल्या कर्मचार्यांना हलक्या स्वरुपाची कामे देणे आवश्यक असताना त्यांचे निलंबन करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या मुख्यसभेत सर्वपक्षीय सभासदांनी यावर आक्षेप नोंदवला. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी पीएमपी प्रशासनाला दिले.पीएमपीएमएलच्या सेवेत कर्तव्य बजावत असताना अनेक कर्मचार्यांना अपंगत्व आलेले आहे. या कर्मचार्यांना गर्दीच्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे कामे करता येत नाहीत. त्यांना बैठ्या स्वरुपाची, हलकी कामे देणे आवश्यक असताना अशा कर्मचार्यांना पूर्वीप्रमाणेच कामे करा, अन्यथा निलंबित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले असून तसे आदेश काढण्यात आले आहेत.
सभासदांचा आक्षेप
पीएमपीच्या या निर्णयावर मुख्यसभेत सर्वपक्षीय सभासदांनी तीव्र आक्षेप नोंदवत भावना व्यक्त केल्या. अपंग कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पीएमपीएमएलने कामावरून काढून टाकले तर कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहणार आहे. आणि चालकाला सेवेत असताना अपंगत्व आले असेल तर त्यांना वाहक आणि चालकाचे काम करता येणार नाही. पीएमपीएमएलने अशा कर्मचार्यांवर बैठी आणि हलक्या स्वरूपाची कामे द्यावीत. त्यांना निलंबित करू नये, असे सभासदांनी यावेळी सांगितले.
…तर सेवानिवृत्ती
याबाबत पीएमपीकडून खुलासा करण्यात आला की, एखाद्या कर्मचार्याला अपघात झाल्यानंतर पाहिले तीन महिने 75 टक्के वेतन दिले जाते. त्यानंतर पुढील तीन महिने 50 टक्के, तर त्यानंतर तीन महिन्यासाठी 30 टक्के वेतन देण्यात येते. मात्र त्यानंतर कर्मचारी सेवेवर रुजू होणे शक्य नसल्यास त्याला सेवानिवृत्त करण्यात येते. अशा प्रकारचा शासनाचा नियम असून त्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. या वर महापौरांनी पीएमपी प्रशासनाला हा निर्णय मागे घेऊन कर्मचार्यांना पुन्हा कामात रुजू करून घेण्याचे आदेश दिले.