पुणे । पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) स्मार्ट शहरी वाहतूक सेवेअंतर्गत असलेल्या इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंन्ट सिस्टीमला (आयटीएमएस) दिल्ली येथील स्कॉच ग्रुपकडून स्कॉच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच राजस्थान सरकारने आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी समिटमध्येही पीएमपीच्या आयटीएमएस कार्यप्रणालीबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दोन महिन्यांपूर्वी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी आयटीएमएस यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यात महामंडळाचे वाहतूक नियोजन व नियंत्रणामध्ये अधिकाधिक अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला होता. तसेच संचलन नियंत्रण, ई तिकीट कार्यप्रणाली, प्रवासी तक्रार निवारण केंद्र, पीएमपी ई-कनेक्ट अॅप असे काही अद्ययावत प्रयोग राबविण्यात आले होते. त्यामुळे महामंडळाच्या सेवेत काही प्रमाणात सकारात्मक बदल घडून प्रवासी केंद्रीत बससेवा होण्यास मदत झाली आहे. याची दखल घेवून महामंडळाच्या आयटीएमएस कार्यप्रणालीस विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या कार्यप्रणालीचा वापर करून दर्जेदार, गुणात्मक सेवा देण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना विचारात घेऊन हा गौरव करण्यात येतो.