पुणे । पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा हळूहळू मार्गावर येऊ लागली आहे. मागील काही महिन्यांपासून मार्गावरील बस, प्रवासी संख्या, उत्पन्नामध्ये सातत्यपूर्ण वाढ होताना दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये सुमारे 50 हजारांची म्हणजे उत्पन्नात सुमारे 6 लाख 90 हजारांनी वाढ झाली आहे.
‘पीएमपी’ची निर्मिती झाल्यापासून विविध कारणांमुळे तोट्यात भर पडत गेली. राजकीय हस्तक्षेप आणि त्यामुळे अधिकार्यांना काम करताना येणार्या मर्यादा, निधीची कमतरता, बसच्या दुरवस्थेमुळे वाढणारा तोटा, रखडलेला आस्थापना आराखडा, बेशिस्त, ठेकेदारी पद्धतीमुळे वाढलेला खर्च अशी विविध कारणे पीएमपीच्या अधोगतीला जबाबदार ठरली. त्यातच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांची पूर्णवेळ नियुक्ती केली जात नव्हती. तुकाराम मुंडे यांची मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अध्यक्षपदी निुयक्ती झाल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवसापासून यंत्रणेत अमूलाग्र बदल करण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे झालेला बदल आता प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. कर्मचारी-अधिकार्यांना शिस्त लावण्यापासून मार्गावर बस वाढविणे, बसेसची स्थिती सुधारण्यासाठी विविध पातळ्यांवर वेग आणल्याने स्थिती सुधारत असल्याचे चित्र आहे.
पाससह इतर बाबींमधून दीड कोटी
पीएमपी प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत मार्गावरील बस संख्येत वाढ झाली आहे. मुंडेे यांनी पदभार स्वीकारला. त्या वेळी एप्रिल महिन्यात दैनंदिन बसची संख्या 1 हजार 368 एवढी होती. नोव्हेंबर महिन्यात हा आकडा 1 हजार 440 वर पोहोचला आहे. सरासरी दैनंदिन तिकीट विक्रीतून मिळणार्या उत्पन्नात 7 लाखांहून अधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबरपर्यंत तिकीट विक्रीतून 1 कोटी 20 लाख रुपयांचे दैनंदिन उत्पन्न मिळत आहे. तर पाससह इतर बाबींमधून मिळणारे एकूण उत्पन्न सुमारे दीड कोटी रुपये आहे. एका बाजूला उत्पन्न वाढत असताना प्रवासी संख्याही वाढत चालली आहे.