पुणे। पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाला कंत्राटी पद्धतीने बस सेवा पुरविणार्या ठेकेदारांच्या बसचालकांचे वेतन गेल्या काही महिन्यांपासून थकले आहे. या वेतनासाठी पुढील दोन दिवसात हे चालक संपावर जाण्याची शक्यता आहे.
पीएमपीने सार्वजनिक वाहतुकीसाठी भाडेतत्वावर काही खासगी बसेस घेतल्या आहेत. या बसेसच्या ठेकेदारांच्या भाड्याची रक्कम गेल्या काही महिन्यांपासून थकली आहे. यामुळे ठेकेदारकांनी बस चालकांचे वेतन केलेले नाही. त्यामुळे पुढील 2 दिवसांत थकीत वेतन न मिळाल्यास खासगी ठेकेदारांचे हे बस चालक संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.
ठेकेदार त्रस्त
पीएमपीएमएलच्या सर्व बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे बस आता कुठे आहे, ती कुठल्या मार्गाने जात आहे, या शिवाय बस थांबेसुद्धा या यंत्रणेमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे बस ही बसथांब्यावर थांबली की नाही, हे सुद्धा आता समजू शकते. त्यासाठी बस थांब्याच्या काही अंतरावरील एरिया कव्हर करण्यात आला आहे. जर बस या अंतरावर थांबली, तर लगेच त्याबाबत समजू शकते. त्यामुळेच बस बसथांब्यावर न थांबता तशीच गेली, तरीही समजू शकते. बस थांब्यावर प्रवासी असो किंवा नसो बस ही थांब्यावर पाच सेकंद तरी थांबलीच पाहिजे, असा नियम आहे आणि हा नियम मोडल्यामुळे कोट्यवधींचा दंड ठेकेदारांना आकारण्यात येत आहे तर दुसरीकडे पीएमपीकडे थकीत असलेली रक्कम वेळेत मिळत नसल्याने ठेकेदार त्रस्त झाले आहेत.