दोन वर्षांत तब्बल 17 बसेस पेटल्या; ‘लॉबिंग’चेही ग्रहण
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील बसेसला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, दि.20 एप्रिल 2016 ते 30 ऑक्टोबर 2018दरम्यान चालू मार्गावर तब्बल 17 बसेसने पेट घेतल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. यात पीएमपीच्या मालकीच्या आणि ठेकेदारांच्या बसेसचा समावेश आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळातील ताफ्यात मालकीच्या 1,440 तर ठेकेदारांच्या 653 बसेस आहेत. यात जुन्या बसेसची संख्या लक्षणीय आहे. अचानक बसेस पेट घेत असल्याने देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आग लागणे, मेन्टेनन्सअभावी बसेसचा अपघात होणे यामध्ये ठेकेदारांकडून चालवण्यात येणार्या बसेसचे प्रमाण जास्त आहे.
दररोज 150 बस बंद
आगारामध्ये फिक्स ड्युटी हवी असल्यास एक महिन्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली जाते. तीनपेक्षा जास्त रजा घ्यायच्या असतील तर एका रजेला 200 रुपये दर आहे. पीएमपीमध्ये ब्रेकडाउनचे प्रमाण जास्त आहे. दररोज 150हून अधिक बस मार्गावरच बंद पडतात. त्यामुळे चालक व वाहकांना त्रास सहन करावा लागतो. परिणामी सुस्थितीतील बस मिळण्यासाठी चालकांकडून आग्रह धरला जातो. त्यासाठी संबंधित अधिकार्यांकडून पैशांची मागणी होते.
चालक व अधिकार्यांमध्ये वाद
अनेक चालक निश्चित केलेल्या बससाठीही आग्रही असतात. पण पैसे न दिल्यास ही बस दिली जात नाही. सुस्थितीत नसलेली बस देऊन चालकांना रवाना केले जाते. असे प्रकार काही आगारांमध्ये घडत असल्याचे काही कर्मचार्यांनी सांगितले. त्यावरून चालक व अधिकार्यांमध्येही वादही होतात. काही वेळा हे वाद विकोपाला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
आगारप्रमुखांकडे वशिलेबाजी
पीएमपीमध्ये एकूण 13 आगारांमार्फत बस संचलनाचे काम चालते. प्रत्येक आगारासाठी प्रमुख असतात. त्यांच्या अंतर्गत बसचे नियोजन, कर्मचार्यांच्या कामाचे नियोजन, बसची देखभाल-दुरुस्ती अशी विविध कामे असतात. काही कामे कमी श्रमाची असतात. हे काम मिळविण्यासाठी काही कर्मचार्यांकडून आगारप्रमुखांकडे वशिलेबाजी केली जाते. काही आगारप्रमुख त्याचा फायदा उचलत कर्मचार्यांकडे पैशांची मागणी करतात. लाईट ड्युटी, फिक्स डुयटी, रजा मंजुरी, वाशिंग सेंटरवर काम, स्टार्टर ड्युटी यासाठी ‘रेट’ निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे कर्मचार्यांनी लेखी तक्रार करण्याची तयारी केली आहे.
ठेकेदारांबाबत समन्वयाचा अभाव
पीएमपीच्या ताफ्यात ठेकेदारांकडून 653 बसेस चालवण्यात येतात. अनेकदा पीएमपी बसचा अपघात झाल्यास, नादुरुस्त बसेस पीएमपी प्रशासनाच दुरुस्त करते. मात्र, ठेकेदारांच्या बसेची देखभाल दुरुस्ती ठेकेदारांकडून स्वतः केली जाते. तसेच या बसेसवरील चालकही ठेकेदारांकडून नेमलेले असल्याने अनेक घटना घडतात. तसेच, त्यांची देखभाल दुरुस्ती वेळोवेळी झाली आहे किंवा नाही याबाबत पीएमपी प्रशासन आणि ठेकेदारांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.
70हून अधिक कर्मचार्यांची तक्रार
दुसरीकडे पीएमपीमध्येही आता फिक्स ड्युटीपासून चांगली बस मिळण्यापर्यंत लॉबिंग केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी काही आगारप्रमुखांनी ‘रेट कार्ड’च तयार केले आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यासाठी कर्मचारी एकत्रित आले असून 70हून अधिक कर्मचार्यांनी अर्जावर सह्याही केल्या आहेत.