पीएमपीच्या बसचे ब्रेक फेल;सहा वाहने एकमेकांवर आदळली

0

पुणे : बिबवेवाडीतील राजीव गांधी नगरपरिसरात पीएमपीएमएल बसचे अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे सहा वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. सोमवारी सकाळी 11.30 वाजता हा अपघात झाला. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे पोलिसांना बचावकार्यात अडथळा येत होता. सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

अपघातात स्कूलबसचाही समावेश
अप्पर डेपोमधून शिवाजीनगरच्या दिशने निघालेली बस डेपोतून बाहेर पडल्यानंतर पाच मिनिटातच या बसचे ब्रेक फेल झाले. तीव्र उतार असल्यामुळे बसने रस्त्याने जाणार्‍या एका टेम्पोला धडक दिली. त्यानंतर खडी वाहतूक करणारा टेम्पो, एक पीएमपीएमएल, एक स्कूल बस आणि दोन दुचाकीही या अपघाताला बळी पडल्या. यामध्ये दुचाकीस्वार काळूराम धनाजी परमार (रा. 2/8 आशरफ नगर, काकडे वस्ती) यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की, दोन पीएमपीएमएल आणि टेम्पो एकमेकात रुतून बसले होते. अखेर जेसीबी मशीनच्या सहाय्याने ही वाहने वेगळी करण्यात आली.

पीएमपीने भरपाई द्यावी
घटनास्थळी दाखल झालेल्या भाजपच्या स्थानिक नगरसेविका रुपाली धावडे यांनी या अपघाताला पीएमपी प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. डेपोमधून बाहेर पडलेली बस पाचच मिनिटात अपघातग्रस्त होते याचा अर्थ बसची काळजी व्यवस्थित घेतली जात नाही. अपघातात जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांना पीएमपी प्रशासनाने योग्य तो मोबदला द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वीही पीएमपी बसचे ब्रेक फेल झाल्याने अशाप्रकारे दोन वेळा अपघात झाला होता, अशी माहिती स्थानिक राहिवशांनी दिली.