पीएमपीच्या 10 कर्मचार्‍यांची पदोन्नती रद्द

0

पुणे । पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) निर्मितीनंतर काही कर्मचार्‍यांना सहा महिन्यांसाठी हंगामी बढती दिली होती. मात्र, प्रशासकीय आराखडा अंतिम झालेला नसताना या कर्मचार्‍यांना संबंधित पदांवर कायम केले होते. ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी या सर्वांच्या बढत्या रद्द करून त्यांना मूळ पदावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

पीएमपी व पीसीएमटी एकत्रीकरण करून पीएमपी ही कंपनी अस्तित्वात आली. एकत्रिकरणाच्या पार्श्‍वभूमीवर 2007 नवीन पद निर्मिती व सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्याबाबत संचालक मंडळामध्ये चर्चा झाली होती. या पदांवर त्यावेळी विविध पदांवर असलेल्या सुमारे 18 कर्मचार्‍यांची नेमणूक पुढील सहा महिन्यांसाठी हंगामी स्वरुपात करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर प्रशासकीय आराखडा अंतिम झालेला नसतानाही 2008 मध्ये संबंधित सर्व कर्मचार्‍यांना त्याच पदावर सुधारीत वेतनश्रेणीसह कायम करण्याचा निर्णय घेतला.

नवीन पदाची वेतनश्रेणी
याबाबत पीएमपीतील राष्ट्रवादी कामगार युनियनने सातत्याने पाठपुरावा केला. मुंडेे यांची नियुक्ती पीएमपीमध्ये झाल्यानंतरही त्यांना याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार मुंडे यांनी सर्व तपासणी करून संबंधित अधिकार्‍यांना मुळ पदावर निुयक्ती देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. एकूण 18 कर्मचार्‍यांपैकी शुक्रवारी 10 कर्मचार्‍यांची नियुक्ती नवीन आस्थापना आराखड्यानुसार निर्मिती करण्यात आलेल्या पदावर केली आहे. त्यांना पुर्वी बढती देण्यात आलेल्या पदाच्या वेतनश्रेणीऐवजी नवीन पदाची वेतनश्रेणी दिली जाईल.