पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने पिंपरी-चिंचवड शहराच्या अंतर्गत भागामधील विद्यार्थी, कामगार प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळातर्फे तीन नवीन मार्गांवर बस सोडण्यात येणार आहे. खंडोबामाळ, आकुर्डी ते चिखली (मार्ग क्र. 330), निगडी ते चर्होली (मार्ग क्र. 340), चिंचवड स्टेशन ते संतनगर(मार्ग क्र. 342) या तीन मार्गांवर तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. या मार्गावर पीएमपीतर्फे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार प्रवाशांच्या सोईकरिता हे मार्ग चालू करण्यात आल्याचे पीएमपीतर्फे सांगण्यात आले आहे.
खंडोबामाळ, आकुर्डी ते चिखली, चिखली ते खंडोबामाळ, आकुर्डी बस दर 25 मिनिटांनी असणार आहे. निगडी ते चर्होली, चर्होली ते निगडी दर 1 तासाला बस असणार आहे. चिंचवड स्टेशन ते संतनगर, संतनगर ते चिंचवड स्टेशन दर 50 मिनिटाला असणार आहे. पीएमपी पिंपरी-चिंचवड भागात पुरेसी सुविधा देत नाही. सुविधा न देता निधी मात्र द्यावा लागतोय, अशी ओरड पिंपरी-चिंचवड महापालिकेत करण्यात आली होती. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे व चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यात वादही झाला होता. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात सेवा वाढविण्यात येतील, असेे पीएमपीतर्फे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे गेल्या महिन्यात पिंपरी-चिंचवड भागात महिला विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. आता नवीन तीन मार्गावर बस सुरू करण्यात येणार आहे.