पीएमपीला संचलन तुटीपोटी 144 कोटीस मान्यता

0

पुणे : पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाला सन 2016-17 या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या संचलन तुटीपोटी महापालिकेच्या वतीने 144 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. ही संचलन तूट भरून काढण्यासाठी महापालिकेकडून पीएमपीला दरमहा 12 कोटी रुपयांचे हप्ते 12 महिने देण्यात येणार असून पीएमपीच्या ताळेबंदाचे लेखापरीक्षण झाल्यानंतर शेवटचा हप्ता दिला जाणार आहे.

पीएमपीमध्ये महापालिकेचा 60 टक्के, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 40 टक्के हिस्सा आहे. त्यामुळे कंपनीच्या संचलन तुटीचा खर्च आणि बस खरेदीवरील करांची रक्कम दोन्ही महापालिकांनी आपापल्या हिश्श्यानुसार पीएमपीला द्यावी, असा आदेश राज्य शासनाने फेब्रुवारी 2014मध्ये दिला होता. पीएमपीला 2016-17 या आर्थिक वर्षात 240 कोटी रुपयांची संचलन तूट आली आहे. महापालिकेच्या हिश्श्यानुसार 144 कोटी रुपये पीएमपीला देणे आहे. त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली होती. त्यानुसार हा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्याला बुधवारी स्थायी समितीने मान्यता दिली. संचलन तुटीपोटी 144 कोटींची रक्कम एकरकमी न देता दरमहा बारा कोटी याप्रमाणे बारा हप्त्यांमध्ये पीएमपीला देण्यात येणार आहेत, तर शेवटचा हप्ता एप्रिल 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीतील संचलन तुटीचे लेखापरीक्षण झाल्यानंतर पीएमपीला दिला जाणार आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.