पीएमपी करणार व्यावसायिक आराखडा

0

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) घटते उत्पन्न, प्रवाशांची घटती संख्या आणि मार्गांवरील बसचे नियोजन ही परिस्थिती सुधारण्यासाठी पीएमपी प्रशासनाने व्यावसायिक आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एका खासगी कंपनीची मदत घेण्याचे ठरविले आहे. पीएमपीच्या ताफ्यात अपुर्‍या बस, उपलब्ध बसमध्ये आयुर्मान संपलेल्या बसचा समावेश, ब्रेक डाउनचे वाढलेले प्रमाण, रद्द होणार्‍या फेर्‍यांची संख्या यामुळे गेल्या काही वर्षांत पीएमपीचे उत्पन्न आणि प्रवासी संख्येत सातत्याने घट होत आहे.

संचित तोटा देखील वाढला आहे. यावर पीएमपी प्रशासनानने उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी एका खासगी कंपनीची मदत घेण्यात आली आहे. या कंपनीत वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचा समावेश आहे. कंपनीकडून पीएमपीला उत्पन्नवाढीसाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रवासी संचलनातून मिळणार्‍या उत्पन्नाबरोबरच पीएमपीला उत्पन्नाचे आणखी कोणते मार्ग उपलब्ध होऊ शकतात, याचा प्रामुख्याने यामध्ये अभ्यास केला जाणार असून, त्याचा आराखडा निश्‍चित केला जाणार आहे, अशी माहिती पीएमपीतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.