पुणे – आयुर्मान ओलांडलेल्या २५५ बसगाड्या पीएमपी ने गेल्या १८ महिन्यात आपल्या ताफ्यातून बाद केल्या आहेत. येवढ्या बसगाड्या बाद केल्या असल्या तरी वाहतूक व्यवस्थेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही असे पीएमपी अधिकाऱ्यांनी सांगितले.
बाद करण्यात आलेल्या बसगाड्या या रस्त्यावर धावू न शकणाऱ्या अत्यंत खराब अवस्थेतीलच होत्या त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही. लवकरच ३०० नवीन बसगाड्यांचा पीएमपी ताफ्यात समावेश होणार आहे. सीएनजी वर चालणाऱ्या आणि इलेक्ट्रिक बसगाड्या ताफ्यात दाखल होत आहेत त्यामुळे जुन्या बसगाड्या बाद करणे अनिवार्य झाले आहे.
सध्या पीएमपी कडे २२०० बसगाड्या आहेत पण, त्यातील ३०० ते ४०० गाड्या ब्रेकडाऊन होतात अशी माहिती सूत्रांनी दिली. ब्रेकडाऊन गाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा येत असल्याने शहर पोलीसही आता पीएमपीकडे तक्रारी करू लागले आहेत. आयुर्मान ओलांडलेल्या बसगाड्यांमुळे प्रवासी वाहतुकीत अडचणी येतात तसेच प्रदुषणातही भर पडते अशा तक्रारी वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटनांनीही केल्या आहेत.