पीएमपी प्रवासी मंचचा मुंढेंना जाहीर पाठिंबा

0

पिंपरी-चिंचवड : पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पीएमपी प्रवासी मंचने पाठिंबा जाहीर केला आहे. नागरिकांनीही मुंढे यांना पाठिंबा द्यावा, यासाठी पीएमपी प्रवासी मंचच्या वतीने ऑनलाईन सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रवासी मंचचे प्रमुख जुगल राठी यांनी सांगितले. तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कर्मचार्‍यांना अनेक नियम घालून दिले. कामाच्या वेळेत वाढ केली, गणवेशाची सक्ती, कार्यालयीन वेळेत इतरत्र जाण्यास मनाई यासोबतच उशिरा येणार्‍या आणि रात्रपाळीत झोपा काढणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई अस्त्र उगारले. त्यामुळे कर्मचार्‍यांना मुंढे यांची कार्यपद्धती रुचलेली नाही. म्हणूनच त्यांच्या कार्यपद्धतीवर आरोप केले जात आहेत, असे प्रवासी मंचने म्हटले आहे.

मुंढेंचे निर्णय प्रवासी हिताचे
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयामुळे कर्मचारीवर्गात नाराजीचा सूर पसरला आहे. मुंढे यांच्या शिस्तीचा बडगा काही कर्मचार्‍यांसह अधिकारीवर्गालाही रुचलेला दिसत नाही. त्यामुळे मुंढे कायद्याच्या बाहेर जाऊन काम करत असल्याचा आरोप काही अधिकार्‍यांनी केला होता. परंतु तुकाराम मुंढे घेत असलेले निर्णय हे पीएमपीएमएलच्या आणि प्रवाशांच्या हिताचे असल्याने त्यांना पीएमपी प्रवाशी मंचचा पाठिंबा असल्याचे जुगल राठी यांनी सांगितले.

नागरिकांनीही पाठिंबा द्यावा
नागरिकांनीदेखील चांगल्या प्रवासी सेवेसाठी मुंढे यांना आपला पाठिंबा द्यावा, यासाठी प्रवासी मंचतर्फे ऑनलाईन सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. पीएमपीएमएलचे नियोजन प्रवासीकेंद्रीत असले पाहिजे, त्यामध्ये नफ्या-तोट्याचा विचार येता कामा नये. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणाहून जास्त गाड्या कशा सोडता येतील, तिकिटाची रक्कम कशी कमी करता येईल, यादृष्टीने विचार करून नियोजन करणे गरजेचे असल्याचे राठी यांनी शेवटी सांगितले.