मुंबई: पीएमसी बँकेतील ठेवीदारांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत ठेवीदारांना एकम लाख रुपयापर्यंत रक्कम काढता येणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांशी संपर्क साधता येईल. आरबीआयने पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. हवालदिल झालेले खातेदार मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. आरबीआयने ही माहिती उच्च न्यायालयात दिली आहे.
बँक खात्यातून पैसे काढण्यावरील बंदीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीवेळी आरबीआयनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात खातेदारांना विवाह, शिक्षण यांच्यासह अन्य आपत्कालीन स्थितीत ५० हजारांपर्यंतची रक्कम काढता येते, असं नमूद केलं आहे. रक्कम काढण्यावर जी बंदी घातली आहे, ती बँक आणि ठेवीदारांच्या हितांच्या रक्षणासाठी गरजेची आहे, असंही आरबीआयनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
पीएमसी बँकेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. २३ डिसेंबरला आरबीआयनं सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. बँकेत पैसे जमा करणाऱ्या ग्राहकांच्या अडचणी कमी करण्यासाठी आरबीआयनं वैद्यकीय उपचार, विवाह, शिक्षण, उपजीविका आदींसह अन्य अडचणी लक्षात घेऊन मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढता येईल, अशी व्यवस्था केली आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत एक लाख रुपयांपर्यंत आणि अन्य कारणांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येतील, अशी माहिती आरबीआयच्या वतीनं वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. या प्रकरणी न्यायालयात ४ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.