नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ओमंग कुमार दिग्दर्शित आणि विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित करू नका अशी मागणी विरोधक करीत आहे. याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. अद्याप हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून पास झालेला नाही. त्यामुळे चित्रपटासंदर्भात हस्तक्षेप करणे घाईचे ठरेल. ‘पीएम नरेंद्र मोदी’ येत्या ११ एप्रिलला प्रदर्शित झाल्यास आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल काय? याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केले. त्यामुळे हा चित्रपट येत्या ११ एप्रिलला रिलीज होतो की नाही, हा सस्पेन्स कायम आहे.
यापूर्वी दोनदा प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. आधी हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. यानंतर ५ एप्रिल चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण ऐन रिलीजच्या तोंडावर मेकर्सनी ही तारीख बदलून ११ एप्रिल ही रिलीज डेट निश्चित केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिमामंडन करणारा चित्रपट आहे, यामुळे मतदार प्रभावित होऊ शकतात, असे या राजकीय पक्षांचे मत आहे.