पीकविम्याचा अग्रीम तातडीने अदा करावा- माजी मंत्री आ.जयकुमारभाऊ रावल
शिंदखेडा मतदार संघाची दुष्काळ परीस्थितीची आढावा बैठक संपन्न
शिंदखेडा (प्रतिनिधी)–शिंदखेडा तालुका आणि साक्री तालुक्यातील दुसाणे महसुल मंडळातील 19 गावांमध्ये पावसाचा 21 दिवसापेक्षा जास्त खंड पडला असून संपूर्ण मतदारसंघातील शेतक-यांना पीकविम्याची अग्रीम रक्कम तातडीने अदा करावी अशा सूचना शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री आ. जयकुमारभाऊ रावल यांनी दिल्या आहेत.
दोंडाईचा वरवाडे नगरपरीषदेच्या सभागृहात शिंदखेडा मतदारसंघातील दुष्काळी परीस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, शिंदखेडा तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे, दोंडाईचा तहसिलदार आर.एस.मोरे, साक्रीचे तहसिलदार साहेबराव सोनवणे, शिंदखेडा गटविकास अधिकारी प्रमोद पवार, साक्रीचे गटविकास अधिकारी सोनवणे, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती महाविरसिंह रावल, पंचायत समितीचे उपसभापती रणजित गिरासे, दोंडाईचा पोलिकेचे मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी, शिंदखेडा नगरपंचायत चे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर, माजी उपनगराध्यक्ष नबू पिंजरी रविंद्र उपाध्ये, निखिल जाधव, भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन, विजय मराठे, नरेंद्र गिरासे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय सुर्यवंशी, पशुधन विकास अधिकारी डॉ संकेत पपुलवाल, महावितरण कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पाटील,विस्तार अधिकारी के एन सोनवणे, तालुका कृषी अधिकारी श्री.तंवर, मंडळ क.षी अधिकारी नवनाथ साबळे, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भरत कुलकर्णी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी के. एन वाघ, विस्तार अधिकारी एस ओ जाधव, जे बी कुवर, यांच्यासह शिंदखेडा आणि साक्री पाणीपुरवठा विभाग, वन विभाग, कृषी विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.यावेळी आ.जयकुमार रावल यांनी कृषी, महसुल, पाणीपुरवठा, त्याचप्रमाणे दोंडाईचा आणि शिंदखेडा नगरपंचायतीच्या आढावा घेतला, त्यानंतर महावितरण कंपनीकडून वीजेच्या समस्येबाबत आढावा घेतला
सर्वच भागात खरीपाची पीके पावसाअभावी करपली आहेत, आता पाऊस येवून देखील उत्पनात कोणतीही वाढ होणार नाही कारण ऐन बोंड येण्याच्या वेळीच पावसाने दडी मारल्याने पीके करपली आहेत, सुलवाडे, सारंगखेडा वगळता कोणत्याही प्रकल्पात पाणी साठा नाही, अशा परीस्थितीत भविष्यात अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवणार आहे, त्यादृष्टीने पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन करण्यात यावे, महसुल विभागाने भविष्यात कुठे टँकर सुरू करता येईल त्यासाठी पाण्याचे स्त्रोत कुठे आहेत याची माहिती सर्व सरपंच आणि ग्रामसेवक यांची बैठक घेवून तयार ठेवावी, कृषी विभागाने येत्या 8 दिवसात मतदारसंघाचा अहवाल तयार करून शासनाला पाठवावा आणि त्यात वस्तुस्थितीदर्शक अहवाल पाठवावा अन्यथा विशिष्ट मंडळांना त्याचा लाभ मिळेल असा प्रकार घडता कामा नये, अशा सूचना आ.जयकुमार रावल यांनी दिल्या. शिंदखेडा तालुक्यात पीक पाहणीचा आढावा घेत असतांना केवळ 50 टक्के पीक पाहणी शेतक-यांनी लावली आहे, त्यामुळे पीकविम्याचा लाभ देतांना अडचण होवू नये म्हणून तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील यांच्या मदतीने तसेच गावातील सरपंच कृषी सहायक यांनी जनजागृती करून 100 टक्के पीकपाहणी लावून घेण्यासाठी शेतक-यांच्या दारापर्यंत पोहचणे आवश्यक आहे, यासाठी प्रत्येक शासकिय अधिका-यांना जबाबदारी देवून ती करून घ्यावे. दुष्काळाच्या सवलती लागू करण्याबाबत आम्ही पाठपुरावा करू. परंतु शासकिय अधिका-यांनी जनतेशी सहानुभूतीने वागून सर्व कामे वेळेवर पूर्ण करून घ्यावीत. यापुढील बैठक ही सर्व सरपंच, शेतकरी ग्रामस्थ यांच्यासमवेत संयुक्तरित्या होईल त्यात प्रत्येक गावाचा आढावा घेण्यात येईल त्यादृष्टीने सर्व मतदारसंघातील अधिका-यांनी तयारी करून ठेवावी. दुष्काळाशी सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासन तयार पाहिजे त्यासाठी चारा छावण्यपासून तर पाण्याचे स्त्रोत शोधून ठेवावे अशा सूचना यावेळी दिल्यात.
बैठकिचे प्रास्ताविक तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी शिरपूर प्रमोद भामरे यांनी व्यक्त केले.