पीकविम्यासाठी 10 दिवसांची मुदत वाढ द्या

0

मुंबई : पीकविम्याच्या प्रतिक्षेसाठी भोकर तालुक्यात झालेला शेतकर्‍यांचा मृत्यू हा शासनाच्या नाकर्तेपणाचा व अयोग्य नियोजनाचा बळी असून अशा घटना रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात पीकविमा भरण्याची मुद्दत 10 दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पीकविम्यासाठी रांगेत उभ्या शेतकर्‍यांच्या मृत्युची दुर्घटना दुर्दैवी असून शासनाने पीकविमा योजनेचे योग्य नियोजन केले असते तर अशी घटना घडली नसती. याबाबत आपण लोकसभेत आवाज उठवणार असून घटनेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून मयत कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लक्ष रुपयांची मदत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव पाठवला आहे. या घटनेला जो कोणी जबाबदार आहे याची चौकशी होवून गुन्हा दाखल झाला पाहिजे असे खा. चव्हाण म्हणाले. संपुर्ण महाराष्ट्रात सारखीच परिस्थिती आहे. वीज नाही, ऑनलाईन मध्ये व्यत्यय आहे. सरकारने योग्य नियोजन न करताच पीकविमा जाहिर केली व अल्पावधीत शेतकर्‍यांना बँकेच्या रांगेत उभे केले. याआधी अशाच प्रकारे नोटबंदीचा निर्णय घेऊन जनतेला दोन महिने रांगेत उभे केले. त्याही वेळी निष्पाप नागरीकांचा नाहक बळी गेला, असेही चव्हाण म्हणाले.