नवापूरला भाजपातर्फे तहसीलदार, सहाय्यक निबंधक, पोलीस निरीक्षकांना निवेदन
नवापूर: शेतकर्यांना बँकेतून पीक कर्ज मिळत नसल्याने आणि शेतकर्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. याबाबत जि.प.सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार सुनिता जर्हाड यांची भेट घेऊन चर्चा करुन तक्रार निवेदन दिले आहे. तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पोलीस निरीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
शेतकर्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा मोठ्या धुमधडाक्यात केली गेली. राज्यभर करून दाखविले असे फलक लावून शेखी मिरविली गेली. तीन महिन्यात कर्जमाफी दिली नाही तर नाव बदलू अशा तोर्यात सरकारतर्फे सांगितले गेले. मात्र, कर्जमाफीची अंमलबजावणी होऊ न शकल्याने महाराष्ट्रातील लाखो शेतकर्यांना खरीप 2020 करिता कर्ज मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. सध्या शेतकर्यांना बँकेतून पिक कर्ज मिळत नाही. बँक अधिकार्यांकडून अपमानित होऊन शेतकर्यांना परतावे लागत असल्याची खंत भाजपातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. सहा महिने उलटले तरी राज्यातील 18 लाख शेतकर्यांच्या नावांची कर्जमाफीची यादीच अद्याप आलेले नाही. ही अवस्था 2 लाखापर्यंत कर्ज असणार्या शेतकर्यांची तर 2 लाखाच्यावर कर्ज असणारे शेतकरी आणि नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन अनुदानाचा आदेशच निघाला नाही. हे शेतकरीही पैसे भरून अडचणीत आलेले आहेत. 22 मे 2020 ला शासनाने आदेश काढून शासन कर्जमाफीची रक्कम भरू शकत नसल्याचे सांगितले.
*फिरवाफिरव करणार्या बँकांवर कारवाई करा*
बँकांनी शासनाच्या नावे कर्ज मिळावे, असे उधारीचे आदेश काढले. त्याची जबाबदारी बँका घेत नाही आणि घेणेही शक्य नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तसा ठराव न घेता शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. राज्यातील शेतकर्यांना खरीप 2020 हंगामाकरिता तातडीने नियोजन करून कर्ज उपलब्ध करून द्यावे. ज्या बँका शेतकर्यांना फिरवाफिरव करीत आहे. अशा सर्व बँकांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा नवापुर तालुका भाजपातर्फे आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल असेही निवेदनात नमूद आहे. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, चिटणीस एजाज शेख, शहराध्यक्ष प्रणव सोनार, शहर सरचिटणीस हेमंत जाधव, माजी दक्षता समिती सदस्य जयंतीलाल अग्रवाल, तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे यांच्या स्वाक्षर्या आहेत.