वाघोद्यातील प्रकार ; उदासीन बँक अधिकार्यांबाबत संताप
रावेर- दीर्घकाळ प्रतीक्षा करूनदेखील नुकसानग्रस्त शेतकर्यांना पीकविम्याचा लाभ न मिळाल्याने तालुक्यातील मोठे वाघोदा येथील संतप्त शेतकर्यांनी मंगळवारी दुपारी जेडीसीसी बँकेच्या शाखा कार्यालयाला कुलूप ठोकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. उदासीन बँक अधिकार्यांबाबत प्रसंगी शेतकर्यांनी शेलक्या शब्दात संताप व्यक्त केला.
चुका दुरुस्तीनंतरही शेतकर्यांना माहिती नाही
तीन महिन्यांपूर्वी पीक विमा लाभार्थींची यादी बँकेला प्राप्त झाली होती. मात्र यादीत शेतकर्यांचे क्षेत्रफळ, गावाचे नाव अशा चुका आढळल्या होत्या. त्यामुळे याद्या तपासणीसाठी व चुका दुरुस्त करण्यासाठी परत पाठवण्यात आल्या, अशी माहिती शेतकर्यांनी दिली. दुरुस्तीनंतर या याद्यांबाबत शेतकर्यांना माहिती मिळत नसल्याने शेतकरी बँकेचे उंबरठे झिजवत आहे. दीर्घकाळ प्रतीक्षा करूनदेखील नुकसानग्रस्त शेतकर्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे मंगळवारी संतप्त झालेल्या शेतकर्यांनी शाखा व्यवस्थापकांसह बँक कर्मचार्यांना विचारणा केली. मात्र पीक विम्याचे पैसे न आल्याचे उत्तर शेतकर्यांना मिळाल्याने शेतकरी किशोर पाटील यांनी यासंदर्भात वरीष्ठांना भ्रमणध्वनीवर विचारणा केली. या संदर्भात बुधवारी मुंबईत बैठक असून, दोन ते तीन दिवसात शेतकर्यांना पिकविम्याचे पैसे मिळतील, असे आश्वासन बँकेच्या वरीष्ठांनी दिले मात्र यापूर्वीदेखील अनेकदा शेतकर्यांना, अशी आश्वासने देण्यात आली आहेत. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी बँकेला कुलूप ठोकले. नितीन सुपे, प्रतीक पाटील, कुलदीप पाटील, अजय महाजन, स्वप्नील महाजन, राजू महाजन, गोविंदा चौधरी आदी शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, बँकेत पैसे आले असून शेतकर्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शेतकर्यांचा पैसा मुद्दाम अडवून ठेवत, त्यावर व्याज मिळवण्याचा प्रयत्न अधिकारी करत असल्याचा आरोप मोठा वाघोद्यातील प्रगतशील शेतकरी किशोर पाटील यांनी केला.