पीठगिरणीसाठी जि. प.च्या महिला व बालकल्याण विभागाकडे 6 हजार 300 महिलांचे प्रस्ताव

0

पुणे । राष्ट्रपिता ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद विविध योजनांच्या माध्यामतून वस्तूंचे वाटप करण्यात येते. महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देऊन स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात येते. 2017-18 वर्षामध्ये पीठगिरणीसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे 6 हजार 300 महिलांचे प्रस्ताव आले आहेत. जिल्ह्याच्या 13 तालुक्यांतील विविध गावांमधील महिलांना पीठगिरणींचा लाभ देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाभरात तब्बल 6 हजार 300 महिलांनी विविध तालुक्यातील पंचायत समितीच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केले आहेत.

विशेष घटक योजनेतून 1 हजार जणींना लाभ
जिल्हा परिषदेच्या विशेष घटक योजनेतून 1 हजार 250 लाभार्थ्यांना पीठगिरणी अल्पावधीत पुरविण्यात येणार आहे. यासाठी आंबेगाव तालुक्यातून 160, दौंडमधून 157, हवेली 39, इंदापूर 45, जुन्नर 391, खेड 6, मावळ 301, मुळशी 5 तर शिरुरमधून 1 प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. भोर, बारामती, पुरंदर तालुक्यातून एकही विशेष घटक योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान अल्पावधीतच कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असून अर्जदारांना पीठगिरणी वितरीत करण्यात येणार आहे.

1 हजार 250 जणांना लाभ
पीठगिरणीचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असणे बंधनकारक होते. तसेच शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत किंवा मतदान ओळखपत्राची छायांकीत प्रत प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक होते. त्यानुसार पंचायत समितीच्या कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या निधीतून 5 हजार 54 तर विशेष घटक योजनेतून 1 हजार 250 महिलांना योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली आहे.

कागदपत्रांची तपासणी
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जिल्ह्यातील महिलांना पीठगिरणीचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार 6 हजार 300 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. अल्पावधीतच प्रस्तावांच्या कागदपत्रांची तपासणी करून अर्जदारांना पीठगिरणी पुरविण्यात येणार आहे.
– दीपक चाटे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील
ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि गावपातळीवर त्यांना रोजगार मिळण्यासाठी पीठगिरणीचा लाभ देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून जास्तीत जास्त प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा परिषदेकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सर्व कागदपत्रांची तपासणी करून महिलांना पीठगिरणी देण्यात येणार आहे.
– राणी शेळके
सभापती महिला व बालकल्याण विभाग