पीडब्लूडीच्या बेकायदेशीर बांधकाम महापालिकेकडून बंद !

0

निगडी-सेक्टर 26 गणेश तलाव येथील संत रविदास मंदिरासमोर महापालिकेच्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभाग (पीब्ल्यूडी)कडून बेकायदेशीर बांधकाम केले जात होते. स्थानिक नागरिकांनी या बेकायदा बांधकामाला कडाडून विरोध करत, त्याची तक्रार महापालिकेकडे केली होती. त्यावर महापालिकेने काम बंद करण्याचे निर्देश देऊन देखील ‘पीब्ल्यूडी’कडून काम सुरुच ठेवले होते. त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध करत आयुक्तांकडे पुन्हा तक्रार केली. नागरिकांच्या वाढत्या रेट्याने गुरुवारी (दि.28) महापालिकेने जागेवर जाऊन काम बंद पाडले.

निगडी, संत रविदास मंदिरासमोर प्राधिकरणाची जागा आहे. ती जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून जागेची देखभाल केली जाते. या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडीब्ल्यूडी)विभागाकडून अनधिकृत बांधकाम सुरु केले होते. 10 फेब्रुवारीला कामाचे भूमिपूजन करण्यात आले. 11 फेब्रुवारीला या बेकायदेशीर कामाला सुरुवात करण्यात आली होती.

उद्यानात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. निसर्गसौदर्य आहे. या बांधकामामुळे या सौंदर्याला बाधा पोहचत होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या बांधकामाला विरोध केला. त्याची महापालिकेच्या सारथी हेल्पलाईवर तक्रार केली. परंतु, त्याची दखल घेतली जात नव्हती. त्याउलट बांधकाम जोरात सुरु होते. सजग नागरिकांनी त्याचा पाठपुरावा सुरु केला. त्यानंतर महापालिकेने काम बंद करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, तरीदेखील बेकायदेशीर बांधकाम सुरु होते.

स्थानिक नागरिकांनी बांधकाम सुरु असलेली छायाचित्रे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविली. आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घेतली. महापालिकेच्या अधिका-यांना जागेवर जाऊन काम बंद करायला लावले. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.