पीडितेचा अर्ज फेटाळला!

0

पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापर पणतू व काँग्रेसचे युवानेते रोहित टिळक यांच्याकडून 41 वर्षीय वकील महिलेचे लैंगिक शोषण, बलात्कार आणि अनैसर्गिक संभोग व मारहाण तसेच अंतरिम अटकपूर्व जामीनअर्जास विरोध या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश लता येणकर यांच्या कोर्टातून अन्य कोणत्याही कोर्टापुढे वर्ग करण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज पीडितेच्यावतीने प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांच्याकडे करण्यात आला होता. या अर्जावर सोमवारी अंतिम सुनावणी झाली असता, हा अर्ज जिल्हा न्यायाधीशांनी फेटाळून लावला. आता संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, अतिरिक्त सत्र न्यायाधीश या मंगळवारी (दि. 8) अंतिम निर्णय देणार आहेत. त्यामुळे हे प्रकरण अन्य कोर्टापुढे चालविण्यास परवानगी देता येणार नाही, असे प्रधान जिल्हा न्यायाधीशांनी स्पष्ट करत, पीडितेची विनंती फेटाळून लावली. तसेच, वरिष्ठ कोर्टात अर्ज केल्याचा कोणताही परिणाम सुनावणीवर होऊ नये, गुणवत्तेवरच निकाल दिला जावा, अशी सूचनाही प्राधान न्यायाधीशांनी अतिरिक्त सत्र न्यायालयास केल्याचे पीडितेच्या वकिलांनी सांगितले.

प्रकरण अंतिम टप्प्यात असल्याने ट्रान्स्फर नको!
अतिरिक्त सत्र न्यायाधीश लता येणकर यांच्यावर संशय व्यक्त करत, 41 वर्षीय पीडितेने प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडे विनंती अर्ज करत, या प्रकरणाची सुनावणी आपण स्वतः घ्यावी किंवा अन्य कोणत्याही कोर्टात वर्ग करावी, अशी याचिका केली होती. त्यावर नोटीस बजावून जिल्हा न्यायाधीशांनी आरोपी पक्षास म्हणणे मांडण्यास सांगितले होते. 4 ऑगस्टला या अर्जावर सुनावणीही घेण्यात आली होती. परंतु, टिळक यांच्या वकिलांनी मुदत मागितल्याने 7 ऑगस्टरोजी अंतिम सुनावणी ठेवली होती. दरम्यान, सोमवारी पीडितेच्यावतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. तसेच, अ‍ॅड. तौसिफ शेख यांच्यामार्फत बाजू मांडली. त्यावर रोहित टिळक यांच्यावतीने अ‍ॅड. नंदू फडके यांनी बाजू मांडत, आता येणकर कोर्टात सुनावणी पूर्ण झाली असून, कोर्ट मंगळवारी अंतिम निकाल देणार आहे. त्यामुळे हे प्रकरण अन्य कोर्टापुढे सुनावणीस देणे चुकीचे ठरेल, असे सांगितले. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण प्रधान जिल्हा न्यायाधीशांनी सुनावणी अन्य कोर्टापुढे हस्तांतरित करण्याच्या विनंतीला नकार देत, अर्ज फेटाळला. तसेच, पीडितेच्यावतीने भरकोर्टात चेहरा उघड करण्यास सांगितल्याच्या मुद्द्यावरही न्यायालयाने हा आरोप वादातीत असल्याचे सांगितले. स्वतःहून बुरखा काढला की काढण्यास सांगितले हे स्पष्ट होत नाही, असे न्यायालय म्हणाले. अटकपूर्व जामीनअर्जास विरोधाच्या याचिकेवरील सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालय कारण नसतानाही पुढे ढकलत गेले. मेरिटवर अटकपूर्व जामीन रद्द करावा, अशी भूमिका यावेळी पीडितेच्या वकिलांनी मांडली होती.

पीडितेच्या अर्जावर आज अंतिम निकाल
दरम्यान, पीडितेने प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडे तक्रारअर्ज केल्याचा परिणाम सुनावणीवर होऊ नये. रोहित टिळक यांच्या अटकपूर्व जामिनास पीडितेने विरोध केला असून, याबाबत निकाल देताना अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुणवत्तेच्या जोरावरच निकाल द्यावा, अशी सूचनाही येणकर कोर्टास केली, अशी माहिती पीडितेचे वकील तौसिफ शेख यांनी दिली आहे. टिळक यांच्या अटकपूर्व जामिनास विरोधासाठी पीडितेने अतिरिक्त सत्र न्यायालयाकडे धाव घेतली होती. त्या अर्जावर मंगळवारी (दि.8) लता येणकर कोर्ट आपला अंतिम निकाल देणार आहे. दरम्यान, हा निकाल विरोधात गेला आणि टिळक यांचा अटकपूर्व जामीन कायम राहिल्यास उच्च न्यायालयात धाव घेऊ, असे पीडितेचे वकील तौसिफ शेख म्हणाले.