पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापर पणतू व काँग्रेसचे युवानेते रोहित टिळक यांच्याकडून 41 वर्षीय वकील महिलेचे लैंगिक शोषण, बलात्कार आणि अनैसर्गिक संभोग व मारहाण तसेच अंतरिम अटकपूर्व जामीनअर्जास विरोध या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश लता येणकर यांच्या कोर्टातून अन्य कोणत्याही कोर्टापुढे वर्ग करण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज पीडितेच्यावतीने प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांच्याकडे करण्यात आला होता. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली असता, काल आपण बाहेरगावी होतो. त्यामुळे आज सकाळी उशीरा नोटीस मिळाली, त्यामुळे या अर्जावर तयारी करण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशी मागणी टिळक यांचे वकील नंदू फडके यांनी केली. त्याला पीडितेच्या वकिलांनी जोरदार विरोध केला. प्रत्येकवेळी आरोपी पक्ष अशाप्रकारे वेळकाढूपणा करतो, असा आक्षेप पीडितेच्या वकिलांनी नोंदविला. त्यावर सोमवारी (दि.7) अंतिम निर्णय देऊ, असे सांगून प्रधान जिल्हा न्यायाधीशांनी सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली.
निष्पाप आहात तर कोर्टबदलास का घाबरता? : पीडितेचे वकील
अतिरिक्त सत्र न्यायाधीश लता येणकर यांच्यावर संशय व्यक्त करत, 41 वर्षीय पीडितेने प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडे विनंती अर्ज करत, या प्रकरणाची सुनावणी आपण स्वतः घ्यावी किंवा अन्य कोणत्याही कोर्टात वर्ग करावी, अशी याचिका केली होती. त्यावर नोटीस बजावून जिल्हा न्यायाधीशांनी आरोपी पक्षास म्हणणे मांडण्यास सांगितले होते. 3 ऑगस्टलाच ही नोटीस आरोपीला मिळाली होती. शुक्रवारी दुपारनंतर या अर्जावर सुनावणी सुरु झाली असता, रोहित टिळक यांचे वकील नंदू फडके यांनी कोर्ट बदलण्याच्या विनंतीस विरोध केला. आता बहुतांश सुनावणी पूर्ण झाली असून, कोर्ट बदलणे योग्य होणार नाही, असे फडके म्हणाले. त्यावर तुम्ही निष्पाप आहात तर कोणत्याही कोर्टास सामोरे जाण्यास का विरोध करत आहात? असा सवाल पीडितेचे वकील तौसिफ शेख यांनी केला. अॅड. फडके यांनी काल आपण कोल्हापूरला गेलो होतो. त्यामुळे नोटीस व संबंधित अर्ज आज सकाळी 11 वाजता पाहण्यात आला. त्यावर तयारी करण्यासाठी आपल्याला वेळ देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर आरोपी पक्ष वारंवार अशाप्रकारे वेळकाढूपणा करत आहे. आमच्या याचिकेवर मेरिटनुसार सुनावणी व्हावी, आणि प्रकरण अन्य कोणत्याही न्यायालयात वर्ग करावे, अशी विनंती अॅड. शेख यांनी केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून प्रधान जिल्हा न्यायालयाने अंतिम सुनावणी 7 ऑगस्टला घेण्याचे ठरविले.
आरोपी पक्षाला हवे येणकर कोर्ट!
अतिरिक्त सत्र न्यायाधीश लता येणकर यांच्याच कोर्टात हे प्रकरण चालावे. फिर्यादी पक्षाने कोर्टाच्या विरोधात भूमिका मांडलेली आहे. आता सुनावणी बर्यापैकी पुुढे सरकलेली आहे, तेव्हा कोर्ट बदलू नये, अशी भूमिका रोहित टिळक यांच्यावतीने अॅड. नंदू फडके यांनी मांडली. त्यावर पीडितेचे वकील तौसिफ शेख यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. आरोपीच्या वकिलांनी केवळ आरोपीची भूमिका मांडावी. कोर्टाची भूमिका सरकारी वकील मांडत बसतील. तुमचे अशील निष्पाप आहेत तर कोणत्याही न्यायालयापुढे आपली बाजू मांडण्यात त्यांना काय अडचण आहे? असा सवाल अॅड. तौसिफ शेख यांनी केला. आमच्या याचिकेवर गुणवत्तेच्या जोरावर निर्णय घेण्यात यावा, अशी विनंतीही अॅड. शेख यांनी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांच्याकडे केली.