पीडित महिलांचे मनोबल समाजाने उंचावणे आवश्यक

0

अन्याय, अत्याचार पीडित महिलेचे मनोबल वाढवीत तिला मानसिक धैर्य देण्याचे काम समाजाने करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी येथे केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, धुळे व महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई अंतर्गत महिला आयोग तुमच्या दारी, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत कार्यशाळा व जनसुनावणीचा कार्यक्रम शुक्रवारी राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात झाला.
सर्व अधिकार्‍यांची उपस्थिती
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव, महिला व बालविकास प्रकल्पाधिकारी सुरेखा पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत, ङ जितेंद्र निळे, ङ मधुकर भिसे, ङ डी. डी. जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश विवेक गव्हाणे हे अध्यक्षस्थानी होते. ठाकरे पुढे म्हणाल्या, महिला आयोगाकडे, मुंबई येथे अनेक पीडित महिला तक्रार निवारणासाठी येतात. यात त्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. या पार्श्वभूमीवर आयोगाने महिला आयोग आपल्या दारी हा आगळा- वेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महिला आयोगाने वर्षभरात सहा विभागांत कार्यशाळा व जनसुनावणीचा कार्यक्रम घेतला.
कौटुंबिक हिंसाचार कायदा अतिशय महत्त्वाचा
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम अनुकरणीय व कौतुकास्पद आहे. एवढेच नव्हे, तर अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. महिलांसाठी असलेल्या कायद्यात, महिला धोरणात झालेले बदल कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे कार्यशाळा उपयुक्त ठरतात. महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या विरोधात सातत्याने कायदे होत आहेत. याची माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अन्याय होत असेल, तर महिलांनी आवाज उठविला पाहिजे, असेही डॉ. पांढरपट्टे यांनी नमूद केले. अपर पोलिस अधीक्षक गवळी यांनी सांगितले, कौटुंबिक हिंसाचार कायदा महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पोलिस ठाण्यात तक्रार घेवून येणार्‍या महिलेबाबत संवेदनशीलता दाखविली पाहिजे. अधिकार्‍यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. महिला तक्रार निवारण कक्षामार्फत समुपदेशनाचे कार्य केले जाते. न्या. गव्हाणे म्हणाले, महिला आयोगाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. माहिती महिलांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यावेळी दामिनी महिला अत्याचार व अन्याय निवारण समितीतर्फे पथनाट्य सादर करण्यात आले. चंद्रकांत येशीराव यांनी सूत्रसंचालन केले. एम. एम. बागूल यांनी आभार मानले.