नवी दिल्ली : जम्मू काश्मरमधील सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रेटीक पार्टी (पीडीपी) चे पुलवामा जिल्हाध्यक्ष अब्दुल गनी डार यांच्यावर दहशवाद्यांनी सोमवारी हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात डार गंभीर जखमी झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अब्दूल गनी डार हे श्रीनगरकडे जात असताना पुलवामा जिल्ह्यातील पाहू आणि पिंगलान या गावांच्यामध्ये दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळाबार केला. या गोळीबारात डार हे मरण पावले. स्थानिक पोलिस अधिकार्याने सांगितले की, डार यांना तातडीने श्रीनगरमधील एसएमएचएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतू गोळीबारात गंभीर जखमी झालेले डार वाचू शकले नाहीत. एसएमएचएस हॉस्पिटलचे डॉक्टर नाझीर चौधरी यांनी सांगितले की, येथे आणण्यापुर्वीच डार यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या छातीवर गोळ्या लागल्या होत्या.
डार हे जम्मू-काश्मीरमधील मोठे नेते होते. 1 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांनी काँग्रेसमधून पीडीपीमध्ये प्रवेश केला होता. मागील दोन आडवड्यातील पीडीपी नेत्यांवरील हा दुसरा हल्ला आहे. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी गेल्या असतानाच हा हल्ला घडवून आणला गेला आहे.