चोपडा । अमृत महोत्सव साजरा करणार्या दि चोपडा पीपल्स को- ऑप बँकेने सार्वजनिक सेवा ट्रस्टच्या माध्यमांतून राबविलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांमधुन आदर्श निर्माण केला आहे. यापुढेही बँकेच्या ट्रस्टने आरोग्यसेवा सर्व स्तरातील जनतेपर्यंत पोहचवावी. नगर परिषदेने देखील याकामी पुढाकार घेत प्रत्येकाला उत्तम आरोग्याची हमी देण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी केले. चोपडा येथील दि चोपडा पीपल्स को-ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट व मुक्ती फाऊंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. अरुणभाई गुजराथी व त्यांचे मोठे बंधू उद्योजक विठ्ठलदास गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य महाशिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
अस्थिरोग, मोतीबिंदू, हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह आदीच्या तपासण्या
यावेळी पीपल्स बँक हॉलमधील मंचावर बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, व्हॉ. चेअरमन प्रवीण गुजराथी, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, माजी नगराध्यक्ष रमणलाल गुजराथी, कृऊबा सभापती जगन्नाथ पाटील, शेतकी संघ प्रेसिडेंट सदाशिव पाटील, चोसाका चेअरमन नीता पाटील, माजी पं.स.सभापती अॅड. डी.पी. पाटील, डॉ दिलीप पाटील, न.पा. गटनेते जीवन चौधरी, मुक्ती फाऊंडेशनचे मुकुंद गोसावी, बँक व सार्वजनिक सेवा ट्रस्टचे संचालक उपस्थित होते. तसेच बँकेच्या अमृत महोत्सवानिमित्त सभासदांना चांदीची भेटवस्तु मान्यवरांच्या वाटप करण्यात आल्या. आरोग्य शिबिरात डॉ.दिलीप पाटील, डॉ.अर्जुन साठे, डॉ.प्रेमचंद तायडे, डॉ.चौधरी यांनी दिवसभर रुग्णांची तपासणी केली. अस्थिरोग, मोतीबिंदु, हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह तपासणी करण्यात आली असून आवश्यकता असल्यास अॅन्जीओग्राफी, अॅन्जियोप्लास्टी, बायपास करण्यात येणार आहे.
275 रूग्णांची तपासणी
सुमारे 275 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 20 रुग्णांचे मोतिबिंदुची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला आहे अशांनी बँकेत संपर्क साधावा असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन चंद्रहास गुजराथी यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय बारी यांनी केले. मुकुंद गोसावी यांनी आरोग्य शिबिराबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष हितेन्द्र देशमुख, नगरसेवक, नगरसेविका, नागरिक, बँकेचे सभासद व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.