पीसीएमसी : कारवाई ठरली राष्ट्रीय अफवा!

0

पिंपरी-चिंचवड : विविध प्रकारच्या वस्तूंची मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पमध्ये महापालिकेने गेल्या आठवड्यात अतिक्रमण हटावची मोठी कारवाई केली. यामध्ये मोबाईल दुकानांवर बेकायदशीरपणे उभारलेली मोबाईल कंपन्यांच्या जाहिरातींचे भव्य फलक, होर्डिंग्ज पाडण्यात आले. या जाहिराती लावण्यासाठी आकाशचिन्ह परवाना नसल्यामुळे महापालिकेचे मोठे जाहिरात उत्पन्न बुडत होते. मात्र, या कारवाईचे फोटो आणि व्हिडिओ सार्‍या देशभर व्हायरल झाले आहेत ‘पुणे-पिंपरीच्या व्यापार्‍यांना सलाम! चिनी मालावर घातला बहिष्कार!’ या हॅशटॅगखाली. मुळ घटनेचा अर्थाअर्थी संबध नसतानाही व्हॉटस्अ‍ॅपवर फॉरवर्ड कुणीतरी एकाने याला भारत-चीन सीमेवरील तणावाची वेळ साधली. याचमुळे पिंपरीची अतिक्रमण हटाव मोहीम ‘राष्ट्रभक्ती’ या नावाखाली देशभरात पोहोचली आहे.

अतिक्रमणांची बाजारपेठ
पिंपरी कॅम्प म्हणजे सिंधी लोकांची वसाहत आहे. भारत-पाकिस्तान फाळणीवेळी स्थलांतरीत झालेल्या लोकांची येथे घरे आहेत. आता इतक्या वर्षाच्या वास्तव्याने ती शहराच्या रुढी परंपरेशी एकरूप झाली आहेत. हे सर्व लोक व्यापारातच गुंतलेले आहेत. आता ही मोठी बाजारपेठ बनली आहे. येथे घरगुती व्यवसायातून तयार होणार्‍या मालापासून परदेशातील अत्युचम वस्तूही मिळतात. त्यामुळे खरेदीसाठी ही बाजारपेठ नेहमी गजबजलेली असते. गणपती, दसरा-दिवाळीमध्ये तर पाय ठेवायलाही जागा येथे नसते. अशा या बाजापेठेत व्यापार्‍यांनी मोठी अतिक्रमणे केली आहेत. याबाबत वारंवार तक्रारी होत असतात.

मोबाईल कंपन्यांची होर्डिंग्ज हटविली
गेल्या काही वर्षापासून व्यापार्‍यांनी आपापल्या दुकानांवर बेकायदेशीरपणे भव्य बोर्ड आणि होर्डिग्ज टांगले होते. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता भल्या मोठ्या होर्डिंग्सने ही बाजारपेठ गजबजली होती. यातील बहुतेक होर्डिंग्स मोबाइल कंपन्यांचे होते. सध्या चायनीज मोबाइल कंपन्या जगभरात खूपच आक्रमकपणे मार्केटिंग करत आहेत. यामुळे सर्वाधिक होर्डिंग्ज याच कंपन्यांचे होते. बर्‍याच दिवसांपासून या होर्डिंग्स विषयी लोकांच्या तक्रारी येत होत्या अखेर पालिकेने मुहूर्त साधला आणि जेसीबी व इतर साहित्याच्या मदतीने हे सगळे होर्डिंग्स उद्ध्वस्त करून टाकले. प्रत्येक दुकानाबाहेरील होर्डिंग्स तोडण्यात आले. ही कारवाई खूप मोठी असल्याने बघ्यांची चांगलीच गर्दी जमली त्यामुळे फोटो आणि व्हिडिओ शूटिंगही झाले. या कारवाईची आणि भारत-चीन सीमेवरील तणावाची टायमिंग जुळून आली. सोशल मीडियावर चीनविरुद्ध जनक्षोभ उसळत असतानाच योगायोगाने ही कारवाई झाली. सर्वच होर्डिंग्स चिनी मोबाइल कंपन्यांचे असल्याने आणि ते तोडत असतानाचे शूटिंग असल्यामुळे क्लिप फिरु लागल्या.

वाह रे नेटकरी!
ज्यांच्या हाती हे फोटो आणि क्लिप आली त्यांनी आपल्या मनानेच चीनविरोधाची कथा रचून हे फोटो आणि क्लिप पुढे पाठवली. अगदी आठ दिवसांच्याआत या क्लिप्स आणि फोटो देशभरात पोहचले. सोबतच संदेशही लिहिले गेले की ‘पुणे आणि पिंपरीच्या व्यापार्‍यांना सलाम, त्यांनी चिनी मालावर बहिष्कार घातला आहे. चिनी मोबाइलचे महागडे होर्डिंग्सदेखील उखाडून फेकले आहेत’. चिनी मोबाइल विकत-विकत आनंदाने व्यापारीदेखील हा सलाम स्विकारत आहेत. एवढेच नव्हे तर यु ट्युुबच्या काही तथाकथित चॅनेल्सने यावर मनानेच स्टोरीज तयार केल्या आणि आता या जगभर व्हायरल होत आहेत. शेजारी देशाच्या काही न्यूज चॅनेल्सनेदेखील याला आपल्या बुलेटिनमध्ये स्थान दिले असल्याचे यु ट्युबवरून कळत आहे.

व्यापार्‍यांची मात्र ‘चिनी’ला पसंती
वास्तव मात्र खूप वेगळे आहे ज्या बाजाराचे गुणगान केले जात आहे. तिथे तुम्ही कोणत्याही भारतीय कंपनीचा मोबाइल मागितला तरी ते आधी चिनी कंपन्यांचे मोबाइल काढून दाखवितात आणि चिनी मोबाइल कसा अधिक स्वस्त आणि अधिक चांगला आहे हे पटवून सांगतात. दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र यांच्याच देशप्रेमाचे गोडवे गायले जात आहेत.