पीसीएमसी : ममता गायकवाड, पुणे : योगेश मुळीक विजयी!

0

दोन्ही महापालिकांच्या तिजोरीच्या चाव्या भाजपच्याच हाती
मोरेश्वर भोंडवे यांचे स्वप्न भंगले, आ. जगताप यांनी दिली धोबीपछाड!
पुणे अन् पिंपरी-चिंचवडमध्येही शिवसेना राहिली ‘तठस्थ’

पुणे/पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्या ममता गायकवाड या तब्बल 11 मतांनी विजयी झाल्या असून, भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रावादी काँग्रेसचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांना केवळ चार मते मिळाल्याने त्यांचे ‘चमत्कार’ घडविण्याचे स्वप्न भंगले आहे. तर दुसरीकडे, पुणे महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे भाजपचे योगेश मुळीक यांनीच बाजी मारली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी दुधाने यांचा पराभव केला. दुधाने यांना 5 तर मुळीक यांना दहा मते पडली. विशेष बाब म्हणजे, राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची भूमिका घेणारी शिवसेना मात्र आश्चर्यकारकपणे दोन्हीही महापालिकांच्या स्थायी समिती निवडणुकीत तठस्थ राहिली आहे. पिंपरीत ममता गायकवाड यांना जागतिक महिला दिनाची भेट मिळाली असून, त्या स्थायीच्या 34 व्या सभापती ठरल्या आहेत. या निवडणुकीत गटबाजी मोडित काढून शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी आपणच किंगमेकर असल्याचे दाखवून दिले असून, आपले कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मोरेश्वर भोंडवे यांनादेखील जोरदार धोबीपछाड दिली आहे. महापौरपद आ. लांडगेगटाला देण्याच्या हमीवर हे बंड शमले असल्याचेही सांगण्यात आले.

पीसीएमसी : मोरेश्वर भोंडवेंचा सात मतांनी पराभव
भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक असलेले राहुल जाधव यांना स्थायी समितीचे सभापती करण्यासाठी आ. लांडगे गटाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, आ. लांगडे गटावर मात करत शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी आपल्या समर्थक ममता गायकवाड यांना स्थायीच्या सभापतिपदासाठी वर्णी लावण्याची खेळी खेळली. पक्षादेश बजावून जाधव यांच्याऐवजी गायकवाड यांचाच अर्ज भरण्यात आला होता. त्यामुळे नाराज झालेल्या आ. लांडगे गटाचे महापौर नितीन काळजे, स्थायीचे सदस्य राहुल जाधव व शीतल शिंदे यांनी राजीनामे दिले होते. भाजपअंतर्गत दुफळीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनीदेखील सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे या पदासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी भाजपने आपल्या सदस्यांना व्हिप बजाविला होता. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषिविकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ममता गायकवाड यांना भाजपचे 10 व एक अपक्ष असे 11 मते मिळाली तर भोंडवे यांना केवळ राष्ट्रवादी काँग्रेसची चार मते पडली. शिवसेनेचा एक सदस्य या निवडणुकीत तठस्थ राहिला. वास्तविक पाहाता, शिवसेनेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. अखेर भोंडवे यांचा सात मतांनी पराभव करत ममता गायकवाड या विजयी झाल्या.

कोण आहेत ममता गायकवाड?
स्थायी समितीत भाजपचे दहा सदस्य असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार तर शिवसेनेचा एक सदस्य आहे. तर एक अपक्ष हा भाजपचा सहयोगी सदस्य आहे. त्यामुळे भाजपची 11 मते ममता गायकवाड यांना पडली असून, शिवसेनेने मोरेश्वर भोंडवे यांना धक्का दिला आहे. नवनियुक्त सभापती ममता गायकवाड या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी आहे. गायकवाड हे आ. लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. या पदासाठी भाजपमधून आ. लांडगे गटाचे राहुल जाधव, निष्ठावंत गटाकडून शीतल शिंदे, प्रा. उत्तम केंदळे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. परंतु, ऐनवेळी ममता गायकवाड यांचे नाव पुढे करून आ. जगताप यांनी सर्वांना धक्का दिला होता. वरिष्ठ पातळीवरून दबाव आणून त्यांनी पक्षांतर्गत नाराजीदेखील दूर केली, तसेच जोरदार घोडेबाजार होत असतानादेखील आपली प्रतिष्ठा पणाला लावून पक्षाच्या मतांसह एका सहयोगी अपक्षाचे मतही गायकवाड यांना मिळवून दिले आहे. गायकवाड या पहिल्यांदाच नगरसेविका झाल्या असून, निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या उमेदवारीवर त्यांनी प्रभाग क्रमांक 26 असलेल्या वाकड-पिंपळे निलख येथून विजय प्राप्त केला होता.

पुण्यात मुळीक यांना 10, दुधाने यांना 5 मते!
पुण्यातही सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धोबीपछाड दिली आहे. भाजपचे वडगाव शेरीचे आमदार जगदिश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांनी सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला होता. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या लक्ष्मी दुधाने या मैदानात उतरल्या होत्या. स्थायी समितीत भाजपचे दहा तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचे मिळून सहा सदस्य आहेत. या निवडणुकीत भूजल संवर्धन अधिकारी शेखर गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. शिवसेनेने मतदान न करता तठस्थ भूमिका बजावली. त्यामुळे मुळीक यांनी 15 विरुद्ध पाच मतांनी विजय संपादन केला. मुळीक यांना दहा मते तर लक्ष्मी दुधाने यांना 5 मते मिळाली. शिवसेनेच्या संगिता ठोसर या गैरहजर राहिल्या. यावेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मावळते सभापती मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांची उपस्थिती होती. पंधरवड्यापूर्वी चिठ्ठीद्वारे आठ सदस्य बाहेर पडले, त्यामध्ये मावळते अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश होता. या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत एकच जल्लोष केला. सभापतिपदी निवड झाल्यानंतर योगेश मुळीक म्हणाले, की सामान्य कार्यकर्त्याला न्या देण्याची भाजपची भूमिका आहे. त्यातूनच मला न्याय मिळाला आहे. वाहतूक सुधारणा, घनकचरा व्यवस्थापनाला आपण प्राधान्य देणार आहोत.