प्राचार्य, विभागप्रमुखांचा विशेष सत्कार
भोसरीः पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक विद्यालयाचा (पीसीपी) राष्ट्रीय अधिस्विकृती प्रमाणपत्र संस्थेने (नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन) नुकतेच ‘राष्ट्रीय अधिस्विकृती प्रमाणपत्र’ देऊन गौरव केला. यानिमित्त पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते पीसीपीच्या प्राचार्या व्हि. एस. बॅकोड यांचा व विभागप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त भाईजान काझी, माजी मंत्री विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई आदी उपस्थित होते. आशिया खंडामध्ये पिंपरी-चिंचवड उद्योग नगरीचा नावलौकिक अनेक दशकांपासून आहे. 1980-90 च्या दशकात महाराष्ट्रात तांत्रिक शिक्षणाचा प्रसार व खासगी संस्थांना परवानगी देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले. त्यावेळी तांत्रिक शिक्षणाची तीव्र कमतरता या परिसरामध्ये जाणवत होती. ही कमतरता भरुन काढणे व पिंपरी-चिंचवड उद्योग क्षेत्रासाठी तांत्रिक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी माजी खासदार दिवंगत शंकरराव बाजीराव पाटील यांनी 1990 साली पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकची (पीसीपी) पायाभरणी केली.
सर्वांच्या प्रयत्नांमुळे मिळाले यश
संस्थेचे अध्यक्ष लांडगे यांनी सांगितले की, अल्पावधीतच पीसीपीचे नाव महाराष्ट्रात शैक्षणिक ब्रँड म्हणून नावारुपास आले. उत्कृष्ठ तांत्रिक शिक्षणाबरोबरच पीसीपीने क्रीडा, तांत्रिक स्पर्धांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळाली आहे. यामुळे उत्कृष्ट शिक्षण गटातील ‘नॅशनल एज्युकेशन समिट 2016’ चा पुरस्कार मिळाला आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर तंत्रशिक्षणाचे नियंत्रण व नियमन करणार्या आयएसटीई संस्थेकडून महाराष्ट्र आणि गोवा विभागात ‘आयएसटीई’ बेस्ट चॅप्टर मिळाले आहे. पीसीपीच्या प्राचार्या, प्राध्यापक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या प्रयत्नामुळे हे यश मिळाले आहे.