पाचव्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरम (पीसीसीएफ) आणि अन्य विविध सामाजिक संस्था शासन आणि प्रशासनाला करत असलेल्या कामाबद्दल जाब विचारत त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे शहरातील कर भरणार्या नागरिकांचा पैसा योग्य कामासाठी वापरला जात आहे, असे मत मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड सिटिझन्स फोरम अर्थात पीसीसीएफच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
चिंचवडमधील सायन्स पार्क येथील सभागृहात रविवारी हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, निगडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रभाकर बोकील, चापेकर समितीचे विश्वस्त रवींद्र नामदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात तुषार शिंदे यांची पीसीसीएफचे मुख्य संयोजक म्हणून निवड करण्यात आली. वैभव घुगे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. पीसीसीएफच्यावतीने येणार्या वर्षभरात राबविण्यात येणार्या उपक्रमांविषयी शिंदे यांनी माहिती सांगितली.
पहिला पुरस्कार प्रवीण निकम यांना
चिंचवड सिटीजन फोरमच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त यावर्षीपासून प्रथमच ‘प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड हा पुरस्कार’ देण्यात येत आहे. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घालणार्या एक नागरिकाला हा पुरस्कार दिला जाणार आहे. प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड हा पहिला पुरस्कार महिलांच्या मासिक पाळीबाबत जनजागृतीचे काम करणार्या प्रवीण निकम या तरुणाला देण्यात आला. निकम यांनी मासिक पाळीबाबत समाजाच्या सर्व स्तरात जागृतीचे महत्त्वाचे काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. सन 2016 मध्ये त्यांना राष्ट्रीय युवा सन्मान, तसेच युनायटेड नेशन्सचे जागतिक युवा अँबेसिडर म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर एक सामाजिक संस्था आणि एक गृहनिर्माण सोसायटीला ‘सामाजिक कार्यगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सामाजिक संस्थांमधून हा पुरस्कार जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम हे अभियान राबवून नदी स्वच्छतेचा संदेश देणार्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी या संस्थेला देण्यात आला. तर, गृह निर्माण सोसायट्यांमधून हा पुरस्कार पाणी बचतीसाठी पुढाकार घेणार्या रावेतमधील सेलेस्टीयल सोसायटीला प्रदान करण्यात आला.
पीसीसीएफचे सकारात्मक काम
खासदार बारणे पुढे म्हणाले की, ठेकेदारांना पोसण्याच्या धोरणाला विरोध करून प्रत्यक्षात होत असलेल्या कामांना सहकार्य केले पाहिजे. पीसीसीएफ याबाबत सकारात्मक काम करत आहे. पीसीसीएफने उभारलेले मेट्रोचे जनआंदोलन सरकारला जाग आणणारे आहे. पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत जावी या मागणीसाठी पीसीसीएफ विविध संघटनांसह आग्रही राहिली आहे. प्रत्येक कामासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे.
कार्याची दखल घेणे आवश्यक
पुरस्काराला उत्तर देताना प्रवीण निकम म्हणाले की, सगळीच कामे संघर्ष करून पुर्ण होत नाहीत. बरीच कामे चांगल्या चर्चांमधूनसुद्धा पूर्ण होतात. पीसीसीएफ चर्चांच्या माध्यमातून कामे करून घेणारी संस्था आहे. युवकांच्या कार्याची दखल घेणं आवश्यक असून माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल निकम यांनी आभार व्यक्त केले. लक्ष्मीकांत भावसार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सूर्यकांत मुथीयान यांनी आभार व्यक्त केले.