रावेत (प्रतिनिधी) – पीसीईटीच्या रावेत येथील पीसीसीओईआर महाविद्यालयाची पहिली बॅच नुकतीच उत्तीर्ण झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात या महाविद्यालयाचा वार्षिक निकाल पहिल्या पाचमध्ये राहिला. तसेच शैक्षणिक, संशोधन, प्लेसमेंट या तीन विभागात लक्षणीय प्रगती केली आहे. संशोधन क्षेत्रात मागील तीन वर्षांत 80 पेटंट आणि 150 कॉपीराईट नोंदणीचा राष्ट्रीय विक्रम नुकताच पीसीसीओईआरच्या नावे नोंदविण्यात आला आहे. यामध्ये पीसीईटीच्या सर्व विश्वस्तांचे मार्गदर्शन आणि प्राध्यापक वृंद व कर्मचार्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे, असे पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी सांगितले.
यांची होती प्रामुख्याने उपस्थिती
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पीसीसीओईआर महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना संबोधित करताना तिवारी बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रशासन अधिकारी पद्माकर विसपुते, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. अ.म.फुलंबरकर आदी उपस्थित होते. तसेच प्रसिध्द गायक प्रशांत नासरी, विराग वानखेडे यांनी उत्कृष्ठ गीत सादर केले.
‘एक्सप्रेशन 2018’ उत्साहात साजरे
‘एक्सप्रेशन 2018’ या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नृत्य, संगीत, गायन सादर करण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनावर आधारीत लघुनाटिका सादर केली. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर आणि प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांच्याहस्ते फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या संघांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रा. प्रिया ओघे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कोथले, नोबल वर्गीस, कौस्तुभ नरवेकर, ओमकार केदार, ऋषभ जैन यांनी आयोजनात सहभाग घेतला. हुसेन पडगावाला, शाश्वीता मुळे, दीपशिखा श्रीवास्तव, कस्तुरी आजगावकर, चिराग शहा यांनी सूत्रसंचालन केले.