नवी दिल्लीः मोदी सरकारकडून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे चारित्र्यहनन सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. चिदंबरम यांच्या अटकेसाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे प्रयत्न सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर ट्विटद्वारे त्यांनी हा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटले की, “मोदी सरकार अमंलबजावणी संचालनालय (ईडी), सीबीआय आणि विविध कणाहीन माध्यमांचा वापर करुन चिदंबरम यांचे चारित्र्यहनन करण्यात येत आहे. अशा प्रकारे सरकारकडून लज्जास्पदरित्या सत्तेचा गैरवापर करण्याचा मी तीव्र निषेध करतो.
काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात सीबीआय आणि ईडीने पी. चिदंबरम यांच्यासंदर्भात वेगवेगळ्या कॅव्हेट याचिका दाखल केल्या आहेत. कॅव्हेट याचिका दाखल केल्यामुळे आता न्यायालयाने सगळ्याच पक्षकारांचे मत जाणून घ्यावे लागणार आहे. पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात सध्या दिलासा मिळालेला नाही. न्यायमूर्ती एन. व्ही. रामाना यांनी पी. चिदंबरम यांची याचिका मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर सुनावणीसाठी पाठवली आहे. ईडीने चिदंबरम यांना रस्ते, वायू आणि समुद्री मार्गाद्वारे प्रवास करण्यास मज्जाव करण्यासाठी लूकआऊट नोटीस जारी केली आहे.